श्रीक्षेत्र माहूर : प्रतिनिधी
श्रीक्षेत्र माहूर शहरासह तालुक्यातील अनेक गावात बिबट्या, अस्वल, रानडुकरांचा वावर असल्याने दहशत पसरली आहे. वन विभागाचे अधिकारी कर्मचारी मात्र दांडूके घेऊन मार्केटमध्ये फिरत असल्याचे दिसून येत आहे. दि.२३ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता शहरातील मातृतीर्थ कुंड परिसरात बेवारस स्थितीत असलेल्या टी.एफ. सी. बिल्डींगमध्ये बिबट्याने रात्रभर मुक्काम केल्याचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्याने शहरातील नागरिकांत भितीचे वातावरण आहे.
शहरातील मातृतीर्थ कुंड परिसर हा जंगलाने व्यापला असून निसर्गरम्य असल्याने नागरिक येथे सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी जातात. तसेच धार्मिक विधी करण्यासाठी दिवसरात्र भाविकांची ये-जा असते. टी पॉइंटपासून पुढे पूर्ण रस्ता जंगलातूनच मातृतीर्थ कुंड परिसराकडे जात असल्याने दोन्ही बाजूनी झाडेझुडपे आहेत. तसेच मातृतीर्थ कुंडात भरपूर पाणी असल्याने सायंकाळनंतर सर्व प्रकारचे वन्य प्राणी येथे पाणी पिण्यासाठी येतात. त्यामुळे दि.२३ रोजी रात्री बिबट्या दिसल्याचा व्हीडीओ व फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने या परिसरात येणा-यांमध्ये भितीचे वातावरण आहे.
परंतु धार्मिक विधी करण्यासाठी येथे येणा-यांच्या जीवाचा धोका पोहोचल्यास वनविभाग त्याची जबाबदारी घेणार का, असा सवाल करण्यात येत आहे. नागरिकांचा संचार असलेल्या भागात वन्य प्राणी येऊ नयेत यासाठी वन विभागाने काही उपाययोजना कराव्यात अथवा या परिसरात लावण्यात आलेल्या कॅमे-यांवर नजर ठेवून नागरिकांना सतर्कतेचा इशारा द्यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. माहूर शहरात तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत भाविकांसाठी टीएफसी सेंटर बांधण्यात आले असून हे टी.एफ. सी. सेंटर गेल्या पाच ते सात वर्षापासून बेवारस असल्याने येथे मोकाट जनावरे जंगली जनावरे आश्रयाला येतात, असे सांगण्यात आले.