नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिरामध्ये २२ जानेवारी रोजी होणा-या रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याबाबत देशभरात उत्सुकता आहे. या सोहळ्याचे निमंत्रण सचिन तेंडुलकर, विराट कोहलीसह अनेक क्रिकेटपटूंना देण्यात आले आहे.
माजी क्रिकेटपटू आणि आम आदमी पक्षाचा खासदार हरभजन सिंग यालाही या सोहळ्याचे निमंत्रण मिळाले आहे. दरम्यान, या सोहळ्यात उपस्थित राहण्यावरून हरभजन सिंग याने रोखठोक भूमिका मांडली आहे.
राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यामध्ये सहभागी होण्यावरून आम आदमी पक्षाचा राज्यसभा खासदार हरभजन सिंग म्हणाला की, कुणी जाईल अथवा न जाईल, मी मात्र या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहे. अनेक राजकीय पक्षांनी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे निमंत्रण नाकारून या सोहळ्यावर टीका केल्याच्या पार्श्वभूमीवर हरभजन सिंगचे हे विधान महत्त्वपूर्ण आहे. मी आज जो काही आहे, तो देवाच्या आशीर्वादामुळे आहे.
हरभजन सिंग म्हणाला की, या काळात मंदिर बांधले जात आहे, हे आमचे सौभाग्य आहे. आपण सर्वांनी तिथे गेले पाहिजे आणि आशीर्वाद घेतले पाहिजेत. बाकी, कुणी जाओ अथवा न जाओ, मी तिथे नक्कीच जाणार आहे. माझा देवावर विश्वास आहे. कुठला पक्ष तिथे जातो आणि कुठला जात नाही, यामुळे मला काही फरक पडत नाही, असेही हरभजन सिंगने स्पष्टपणे सांगितले.
यावेळी राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यामध्ये न जाणा-या इतर पक्षांवरही हरभजन सिंगने टीका केली. जर मी राम मंदिरामध्ये गेल्याने कुणाला काही अडचण असेल, तर त्यांनी हवे ते करावे. मी देवावर विश्वास ठेवतो, माझ्या आयुष्यात काही गोष्टी घडल्यात. त्या देवाच्या कृपेने घडल्या आहेत. त्यामुळे मी आशीर्वाद घेण्यासाठी जाणार आहे.