छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
‘मी पुन्हा येईन’ हे वाक्य महाराष्ट्राच्या राजकारणात कधीकाळी विनोदाचे आणि थट्टा-मस्करीचे ठरले होते. देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री झाल्यामुळे या वाक्यालाही आता वजन आले आहे. शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या वाढदिवसाला शक्तिप्रदर्शन करत ‘मी पुन्हा येईन’ असा इशारा स्वपक्षीयांसह विरोधकांना दिला आहे.
शिवसेना (शिंदे गट) आमदार अब्दुल सत्तार यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. आपल्या भाषणात त्यांनी ‘मी पुन्हा येईन’, असे म्हणत स्वत:च्या पक्षातील मंत्र्यांसह विरोधकांना इशारा दिला. आमदार सत्तार म्हणाले की, आता अडीच वर्षे वाट पाहावी लागेल, त्यानंतर जर मंत्रिपद मिळाले नाही, तर लोकांच्या मागणीचा विचार करू.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जोपर्यंत माझ्यावर विश्वास आहे तोपर्यंत मला कुठेही जाण्याचे कारण नाही. मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळ येथे आयोजित सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने त्यांनी मंत्रिपदासाठी पक्षावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमात जालन्याचे काँग्रेस खासदार कल्याण काळे उपस्थित होते. तर शहरात लागलेल्या बॅनरवर पक्षातील कोणत्याच नेत्यांचे फोटो नव्हते यामुळे चर्चांना उधाण आले होते. यावेळी त्यांनी पक्षातील नेत्यांना धमकीवजा इशाराही दिला.
अडीच वर्षे थांबा, कामात कमी पडणार नाही. सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांना पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळालेले नाही. यामुळे त्यांची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. त्यावर ६१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सत्तार म्हणाले की, तुम्हालाही अडीच वर्ष थांबवावे लागणार आहे. या अडीच वर्षांत कुठे कामावर कमी पडणार नाही याची ग्वाही देतो. त्यानंतर आपण पुन्हा मंत्रिमंडळात असणार आहोत.