मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि भाजप नेते सुरेश धस यांच्याकडून संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनजंय मुंडे यांना सहआरोपी करण्याची मागणी केली जात आहे. याशिवाय धनंजय मुंडे यांचे निवासस्थान ‘सातपुडा’ बंगल्यावर घेतलेल्या बैठकीची चौकशी करण्याची मागणी सुरेश धसांकडून केली जात आहे.
दरम्यान, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला ८४ दिवस उलटून गेल्यानंतर आज ४ मार्चला धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आला. गेल्या दोन महिन्यांपासून देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी अगदी सत्ताधारी नेते, सामाजिक कार्यकर्त्यांसह विरोधकांकडून केली जात होती.
संतोष देशमुख यांच्या हत्येचे नियोजन खूप आधीपासून सुरू होते. १४ जून रोजी धनंजय मुंडे यांचे परळीतील निवासस्थान सातपुडा येथे एक बैठक झाली होती. याच बैठकीत वाल्मिक कराडने प्लॅनिंग केले होते. पवनचक्की कंपनीकडे खंडणी मागण्यासाठी मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सुनील बिक्कड, अधिकारी शुक्ला, काळकुटे, वाल्मिक कराड आणि स्वत: धनंजय मुंडे उपस्थित असल्याचा दावा सुरेश धसांकडून केला जात आहे. या बैठकीत कंपनीच्या अधिका-यांकडे तीन कोटींची खंडणी मागण्यात आली होती. यानंतर कंपनीच्या अधिका-यांनी त्यांच्या वरिष्ठांना हा प्रकार कळवला. यावर कंपनीच्या वरिष्ठांनी दोन कोटींवर निश्चिती दर्शवली होती. मात्र निवडणुकीसाठी तातडीने ५० लाखांची मागणी करण्यात आली होती. यावेळी कंपनीने त्यांना ५० लाख दिले होते.
ते पैसे धनंजय मुंडेंनी घेतले की वाल्मिक कराडने हे माहीत नसल्याचे सुरेश धस यांनी सांगितले होते. मात्र मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर खंडणीसाठी अशा बैठका झाल्याचे सुरेश धस यांनी सांगितले आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांना अप्रत्यक्षपणे संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी केली जात आहे.