21.6 C
Latur
Wednesday, November 27, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्रिपदाबाबत भाजपश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य

मुख्यमंत्रिपदाबाबत भाजपश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य

एकनाथ शिंदेंच्या विधानाने मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटला

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यात महायुतीला मोठे यश प्राप्त झाले आहे. मात्र अजूनही मुख्यमंत्रिपदाबाबत महायुतीकडून कोणताही निर्णय झाला नाही. यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. मुख्यमंत्रिपदाबाबत भाजपश्रेष्ठी निर्णय घेतील त्याला आमचे समर्थन असेल, अशी भूमिका राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यात मिळालेला हा सर्वांत मोठा विजय आहे. महाविकास आघाडीने थांबवलेली कामे आम्ही मागच्या अडीच वर्षांत पूर्णत्वास नेली. काही कामे सुरू आहेत. मी कॉमन मॅन म्हणून काम केले. पायाला भिंगरी लावून कार्यकर्त्याप्रमाणे काम केले. मी कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ताच राहणार.

गेली अडीच वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्या मागे पहाडासारखे उभे राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. अडीच वर्षांच्या कार्यकाळात मी खूप समाधानी आहे. आम्ही जे काम केले, निर्णय घेतले त्याची पोचपावती जनतेने आम्हाला दिली. मी समाधानी आहे. आम्ही नाराज होऊन रडणारे नाही तर लढणारे आहोत. रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत महाराष्ट्रासाठी काम करेन. मी काल पंतप्रधान मोदी यांना फोन केला होता. त्यांनी घेतलेला निर्णय आमच्यासाठी अंतिम आहे. सत्तास्थापनेसाठी आमच्याकडून कोणतीही अडचण होणार नाही. मुख्यमंत्रिपदाबाबत भाजपश्रेष्ठी निर्णय घेतील त्याला आमचे समर्थन असेल.

राज्यात २० तारखेला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले होते. तर २३ तारखेला निकाल जाहीर झाला आहे. राज्यात महायुतीला मोठे यश प्राप्त झाले आहे. तर महाविकास आघाडीला ५० जागांवरच विजय मिळवता आला आहे. मात्र आता राज्यात मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष आणि काही अपक्ष आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिल्याचे समजते आहे. तर शिवसेनेकडून एकनाथ
शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान आज एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR