23 C
Latur
Wednesday, December 4, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीसच!

मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीसच!

विधिमंडळाच्या नेतेपदी निवड शपथविधीचे काऊंटडाऊन सुरू

मुंबई : प्रतिनिधी
गेल्या ११ दिवसांपासून सुरू असलेला महायुतीतील हायव्होल्टेज ड्रामा अखेर संपला आहे. देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळाचा नेता म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळे फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उद्या ५ डिसेंबर रोजी फडणवीस यांचा आझाद मैदानावर ग्रँड शपथविधी सोहळा होणार आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीनंतर राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस राज्याचा कारभार सांभाळतील.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आणि भाजप हा सर्वांत मोठा पक्ष ठरला. निकालानंतर आता १० दिवस उलटून गेले आहेत. महायुतीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आपापल्या विधिमंडळ गटनेत्याची निवड केलेली आहे. पण सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या भाजपकडून विधिमंडळ गटनेता निवडण्यात आला नव्हता. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून आज ४ डिसेंबर रोजी विधिमंडळ गटनेता निवडण्याची महत्त्वाची बैठक विधिमंडळात पार पडली.

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या हालचालींचा वेग
या बैठकीपूर्वी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन हे हजर होते. यावेळी गटनेतेपदासह विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यानंतर विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपच्या आमदारांची विधिमंडळ गटनेता निवडीची बैठक सुरू झाली. यावेळी सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांनी गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडला. तर आशिष शेलार आणि रवींद्र चव्हाण यांनी या प्रस्तावावर अनुमोदन दिले.

त्यानंतर अखेर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. यानंतर आता महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या हालचालींचा वेग आला आहे. केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत विधिमंडळ पक्षनेतेपदी शिक्कामोर्तब करण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर अखेर सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

आजच सत्ता स्थापनेचा दावा
देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर फडणवीस आजच राज्यापालांना सत्ता स्थापनेचे पत्र देणार असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी फडणवीस यांच्यासोबत अजित पवार असण्याची शक्यता आहे. तर एकनाथ शिंदे हे फडणवीस यांच्यासोबत असतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी हे भाजपचे दोन्ही निरीक्षक राजभवनावर शिष्टमंडळासोबत जाण्याची शक्यता आहे.

उद्या शपथविधी सोहळा
आता भाजपचा विधिमंडळ गटनेता निवडल्यानंतर महायुतीकडून राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येणार आहे. यानंतर उद्या, गुरुवार, ५ डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानात नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न होईल. मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी उद्या होईल, असे सांगितले जात आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असणार आहेत. या सोहळ्याला अमित शहा, जे. पी. नड्डा, नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक मान्यवर, धर्मगुरू, संत-महंत उपस्थित राहणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR