मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्रीपदाच्या चेह-याबाबत चर्चा होण्याचे काही कारण नाही. महाराष्ट्रातील महायुतीचे महाभ्रष्ट सरकार घालवणे महत्त्वाचे असल्याचे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता कधी लागणार याकडे आता राज्याचे लक्ष लागल्याचे सांगितले जात आहे. परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी निवडणुकीत कितपत प्रभाव पाडू शकेल, याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यातच आता पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाबाबत महाविकास आघाडीत चर्चांना सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची दिल्लीत महत्त्वाची बैठक होती. बैठकीसाठी काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते दिल्लीत दाखल झाले. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथल्ला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, वर्षा गायकवाड दिल्लीत गेले आहेत. राहुल गांधी महाराष्ट्राचा आढावा घेणार असल्याचे म्हटले जात आहे. यावेळी मीडियाशी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.
या बैठकीत मुख्यमंत्रीपदाच्या चेह-याबाबत चर्चा होण्याचे काही कारण नाही. महाराष्ट्रातील महायुतीचे महाभ्रष्ट सरकार घालवणे महत्त्वाचे आहे. तो मुख्य उद्देश आमचा आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. अद्यापही महाविकास आघाडीचा फॉर्म्युला आणि जागावाटप अंतिम होताना दिसत नाही, याबाबत बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, चर्चा सुरू आहे. लवकरच सगळे होईल. याला टाइम लिमिट आहे. या टाइम लिमिटमध्ये गोष्टी कराव्याच लागतात, असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा अशी वारंवार मागणी करणारे उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत घुमजाव करीत वेगळी भूमिका मांडली. महायुतीने आधी आपला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, मग आम्ही आमचा चेहरा जाहीर करतो, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही त्या म्हणण्याला दुजोरा दिला. आमच्यासाठी जनतेचे हित महत्त्वाचे आहे, अशी भूमिका मविआच्या या तीनही प्रमुख नेत्यांनी जाहीर केली.