मुंबई : वृत्तसंस्था
बिहारचे नेते नितीश कुमार यांच्यानंतर आपला देखील उपमुख्यमंत्रीपदाबाबत रेकॉर्ड आहे. त्यामुळे मुख्यमंत्री होण्याची आपली इच्छा आहे का? असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी मनमोकळेपणाने प्रतिक्रिया दिली. “मुख्यमंत्री बनायचं आहे. पण काय करणार? आमची गाडी तिथेच अटकते. मी प्रयत्न करतो की, ती गाडी पुढे जावी. पण संधी मिळत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकदा 2004 मध्ये संधी मिळाली होती. पण पक्षाच्या नेतृत्वाने ती संधी गमावली होती. जो कुणी त्या खुर्चीवर बसतो, त्यांना ती खुर्ची चांगली वाटते. त्याच दृष्टीकोनाने प्रत्येकाने प्रयत्न करायचे प्रत्येकाचं काम आहे. पण मुख्यमंत्रीपदाची खुर्ची एकच आहे. जो 145 चा आकडा मिळवणार त्याच्याच पक्षाचा मुख्यमंत्री बनणार, असं अजित पवार म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाबाबतची आपल्या मनातील खंत व्यक्त केली आहे. अजित पवार यांनी एका हिंदी वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांवर रोखठोकपणे भूमिका मांडली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबतची असणारी आपली खंत पुन्हा एकदा व्यक्त केली.
शरद पवारांसोबतच्या भेटीबाबत म्हणाले…
विशेष म्हणजे काका शरद पवार यांच्यासोबतच्या भेटीबाबतही अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. “मी सरकारमध्ये जुलै महिन्यात गेलो होतो. त्यानंतर दिवाळी सण आला होता. त्या काळात आम्ही भेटलो होतो. आम्ही एकत्र येत दिवाळी साजरी केली होती. घरात राजकारण नसतं. आम्ही घरात एक-दुसऱ्याला जेवण देतो ना, ते माझे मोठे काका आहे. तर मी त्यांना काय बोलणार? त्यांच्या डोळ्यांमध्ये डोळे टाकून मी बघू देखील शकत नाही”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.
महायुतीत विधानसभा लढणार…
आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीसोबतच निवडणूक लढवणार का? असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपण महायुतीसोबतच कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलं. “आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही तीनही पक्ष एकत्र बसू. आम्ही कालच अमित शाह यांच्यासोबत बसलो होतो. आमच्यात जागावाटपाबाबत चर्चा झाली