27.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री शिंदे अज्ञातस्थळी

मुख्यमंत्री शिंदे अज्ञातस्थळी

रात्री उशिरापर्यंत प्रतीक्षा, शिंदे गटाचे नेते ताटकळले
ठाणे : प्रतिनिधी
शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारीची दुसरी यादी जाहीर होण्यापूर्वी अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. शुक्रवारी संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी दादा भुसे, उदय सामंत, हेमंत गोडसे दाखल झाले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांचा पत्ताच लागत नव्हता. त्यामुळे तब्बल २ तास वाट पाहिली. पण थांगपत्ताच लागत नसल्याने हेमंत गोडसे नाशिकला निघून गेले. उदय सामंत, दादा भुसे आणि इतर नेते मुंबईच्या दिशेने रवाना झाले. रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री कुठे गेले, याचा अंदाज लागला नव्हता. ते अज्ञातस्थळी गेल्याचे समजले.

मुख्यमंत्र्यांची ठाण्यातील निवासस्थानी भेट घेण्यासाठी शिवसेना नेते दादा भुसे आणि सुहास कांदे दोन तासांपासून बसले होते. त्यानंतर किरण सामंत आणि उदय सामंत दाखल झाले. तेही भेटीच्या प्रतीक्षेत होते. त्यानंतर हेमंत गोडसेही तेथे आले. पण त्यांनाही मुख्यमंत्र्यांची भेट होऊ शकली नाही. शेवटी श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर हेमंत गोडसे नाशिकला गेले. त्यानंतरही जवळपास ५ तास मुख्यमंत्री नेमके कुठे गेले, याचा अंदाज आला नाही.

शिंदेंच्या शिवसेनेने त्यांचे आठ उमेदवार जाहीर केले असून आणखी चार ते पाच ठिकाणच्या उमेदवारांची नावे घोषित होणे बाकी आहे. त्यात नाशिकच्या जागेचा वाद चव्हाट्यावर आलेला आहे. नाशिकमध्ये खासदार हेमंत गोडसे यांच्या विरोधात भाजपच्या आमदारांनी मोर्चा उघडला आहे. दुसरीकडे सिंधुदुर्ग लोकसभेसाठी राज्याचे मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत आग्रही आहेत. भाजपने या मतदारसंघावर दावा केला असून त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी आहे.

मुख्यमंत्र्यांनी भेट टाळली?
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचे नियोजन आणि उमेदवारी यासंदर्भात शिवसेनेचे नेते आणि मंत्री दादा भुसे, उदय सामंत, खा. हेमंत गोडसे, सुहास कांदे यांच्यासह अनेक नेते मुख्यमंत्र्यांच्या प्रतीक्षेत बराचवेळ बसले होते. परंतु मुख्यमंत्र्यांचा अजिबात थांगपत्ता लागली नाही. दरम्यान, निवासस्थानी आलेल्या मंत्र्यांची भेट घेणे त्यांनी टाळल्याचे सूत्रांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR