संभाजीनगर : विशेष प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यामध्ये जन आक्रोश मोर्चे सुरू आहेत. आज (१९ जानेवारी) छत्रपती संभाजीनगरमध्ये संतोष देशमुख आणि परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय देण्यासाठी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातून मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला कडक इशारा देत धनंजय मुंडे यांच्यावर सुद्धा घणाघाती प्रहार केला.
संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबीयांच्या पाठीशी सुद्धा उभे राहणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. देशमुख हत्या प्रकरणात फार मोठे नेटवर्क असून खंडणी, खून, पैसा पुरवणारे, त्यांना लपवणारे, डाके टाकणारे, बलात्कार, छेडछाड करणा-यांची टीम असल्याचे ते म्हणाले. ज्यांनी खून करायला पाठवले, सामूहिक कट रचला तो सगळ्यात मोठा गुन्हेगार असल्याचेही ते म्हणाले.
जरांगे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्याने लोक शांत आहेत. यातील एकही जण सुटला तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी असल्याचा इशारा जरांगे पाटील यांना दिला. खंडणी आणि खून करणा-यांना सांभाळलं कुणी? हे चार्जशीटमध्ये आलेच पाहिजे, अशी मागणी सुद्धा त्यांनी केली. ज्या दिवशी आरोपी सुटतील असे आम्हाला वाटेल त्या दिवशी राज्य बंद करू, असा इशारा जरांगे पाटील यांनी जन आक्रोश मोर्चातून दिला.
समोरचा डाव टाकतो ते ओळखायला शिका. देशमुख कुटुंबावर आलेली वेळ ही राज्यात कोणावरही येऊ नये. हे पुढील काळात होऊ द्यायचे नसेल, तर धनंजय मुंडेंच्या टोळ्या संपवा असे ते म्हणाले. धनंजय मुंडेंची त्यांच्या लोकांना मूक संमती असल्याचा आरोपही त्यांनी केला एकदा मराठा बिथरला तर तुझी टोळी चटणीला देखील उरणार नाही, असा इशारा सुद्धा जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना दिला. सूर्यवंशी यांच्या न्यायासाठी मुंबईला लॉँग मार्च जाणार आहे. त्या मोर्चामध्ये सहभागी असणा-यांना मराठा समाजाने खाण्यापिण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन त्यांनी केले.