17.5 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच मुली असुरक्षित

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच मुली असुरक्षित

 पोक्सो अंतर्गत दररोज एका प्रकरणाची होते नोंद

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या ठाणे शहरातच लहान मुले सुरक्षित नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या शहरात पोक्सो कायद्यांतर्गत दररोज किमान एक प्रकरण नोंदवले जात आहे.

धक्कादायक म्हणजे ही आकडेवारी या वर्षीची असून, १६ ऑगस्टपर्यंतची आहे. शहराच्या पाच झोनमध्ये नोंदवलेल्या २३३ प्रकरणांपैकी एक चतुर्थांश प्रकरणे एकट्या कल्याण शहर आणि परिसरामधील आहेत. यामुळे मुख्यमंत्र्यांच्याच मतदारसंघात कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वजाले असतील तर अन्य जिल्ह्यांची काय स्थिती असेल असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठाणे पोलिसांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार १६ ऑगस्टपर्यंत नोंद झालेल्या २३३ प्रकरणांपैकी १८० प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तर नुकतेच बदलापूरमध्ये दोन चिमुकलींवर झालेल्या लैंगिक शोषणाचे प्रकरण हे उल्हासनगर झोन अंतर्गत येते. बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिर या शाळेत झालेल्या लैंगिक शोषणाच्या घटनेमुळे बदलापूर हादरून गेले असून, संतप्त नागरिक आणि पालकांनी मोठे आंदोलन करून शहरात बंद पाळला होता.

यासोबतच ‘रेल रोको’ही करण्यात आला होता. तसेच या घटनेचा निषेध पूर्ण राज्यभर केला जात आहे. या निषेधानंतर शासन आणि प्रशासन खडबडून जागे झाले. या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने २६ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे. दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील पोक्सो कायद्यान्वये दाखल झालेल्या प्रकरणांची आकडेवारी पुढे आल्यामुळे ठाणे जिल्ह्यातील मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR