मुरुड : प्रतिनिधी
काही लोक कोयता कु-हाडीच्या भाषा करत आहेत, जातीवाद निर्माण करत आहेत, मराठा समाजाला उचकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा परिस्थितीत मराठा समाजाने आपल्या रागावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. मी सदैव शांततेची भाषा करत आहे. समाजाला शांत राहण्यास सांगत आहे. पण काही लोक दंगलीची भाषा बोलत आहेत. अशा लोकांची मस्ती उतरायला वेळ लागणार नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी अशा लोकांना रोखावे, असे आवाहन मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी लातूर तालुक्यातील मुरुड येथे दि. ११ डिसेंबर रोजी झालेल्या विराट सभेत बोलताना केले.
मराठा समाजाने आरक्षणासाठी शेकडो लेकरा बाळांचे बलिदान दिले आहे. ७० वर्षानंतर आता आरक्षण मिळण्याचे चिन्ह दिसत आहेत. अशा वेळेस मराठा समाजाने आपली एकजूट अखंड ठेवण्याची आवश्यकता आहे, असे नमुद करुन आम्हाला पण मर्यादा आहेत प्रत्येक वेळेस उद्रेकाची भाषा करणा-यांना मला जशास तसे उत्तर द्यावे लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी सरकारला दिला. आमच्या मर्यादेचा अंत होणार नाही, याची काळजी सरकारने घ्यावी. आम्ही हक्काचे आरक्षण मागत आहोत. जातीय तेढाची भाषा न करता आमचा हक्क मागत आहोत. मात्र वेळप्रसंगी आमच्या लेकराच्या न्यायासाठी कोणत्या टोकाला जाण्याची आमची तयारी आहे. आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. आपणाला जिंकण्यासाठी ताकदीने उभे राहायचे आहे. कोणत्याही परिस्थितीत ही लढाई जिंकायचीच आहे हे विसरु नका.
अनेक वर्षानंतर मराठा समाज करोडोंच्या संख्येने एक झाला आहे या गोष्टीचा मला अभिमान आहे. राजकारन्यांचे एकूण आपली फूट पडू देऊ नका. राजकारणी लोक संभ्रम निर्माण करतील, फूट पाडतील मात्र त्यांचे डावपेज ओळखा, एक रहा, एकजूट वाढवा.
सगळे नेते मराठ्यांचे जीवावर मोठे झाले त्यांची पोरे मंत्री झाली मात्र गोरगरिबांचे अश्रू पुसायला कोणी येत नाही, अशी खंत व्यक्त करुन ते म्हणाले की, हा लढा गोरगरीबांनी गोरगरीबांसाठी लढायचा आहे. आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. अशी संधी पुन्हा येणार नाही. मराठा समाजाने शांततेत हे आरक्षण पदरात पाडून घ्यायचे आहे. स्वप्न साकार करण्याची वेळ आली आहे. या संधीचे सोने करा कोणी किती डाव केले तरी ते यशस्वी होऊ देऊ नका आपणाला लढाई शांततेत करायची आहे व जिंकायची आहे. मनोज जारांगे पाटील यांचे आगमन होताच एक्कावण जेसीबीच्या साहाय्याने त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. घराच्या गच्चीत उभे राहून महिला, मुलांनीही फुलाची उधळण केली. मुरुड व परिसरातील अंदाजे एक लाख लोक या सभेसाठी आले होते. या सभेत महिलांची संख्या लक्षणीय होती.