पटोले यांचा हल्लाबोल, सभागृहात माहिती दिलीच नाही
मुंबई : प्रतिनिधी
बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील नैतिक जबाबदारी म्हणून महायुतीमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर नैतिकतेच्या मुद्यावर हा राजीनामा घेतल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले. पण अडीच महिन्यांपासून नैतिकता कुठे होती, असा सवाल उपस्थित करीत कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आणि उद्या मुख्यमत्र्यांवर हक्कभंग आणणार, असे म्हटले.
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक झाली. त्यानंतर सकाळी मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्याचे सांगितले. मात्र, तांत्रिकदृष्ट्या अद्यापही त्यांचा राजीनामा घेण्यात आल्याची माहिती सभागृहात सांगण्यात आली नसल्याचे काँग्रेस नेते आणि आमदार नाना पटोले यांनी म्हटले आणि यासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार असल्याचे म्हटले.
मुख्यमंत्री रात्री ताफा घेऊन अजित पवारांना भेटायला जातात, राजीनामा लिहून घेतात. राजीनामा आल्यानंतर थेट माध्यमांना येऊन सांगतात. पण नियमानुसार मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला त्याबाबत सांगणे अपेक्षित होते. त्यामुळे उद्या आम्ही मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग आणणार आहोत, असे नाना पटोले म्हणाले.
गृहखात्याने माहिती का लपविली?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती थेट माध्यमांना दिली. पण सभागृहाला दिली नाही. गेल्या अधिवेशनात नागपुरात जे काही बोलले ते खोट होते, अजून किती लपवणार, गृहखात्याकडे ही माहिती नव्हती का, गृहखात्याने ही माहिती का लपवली, असा सवाल नाना पटोले यांनी विचारला. तसेच सरकारदेखील सहआरोपी आहे. या सरकारला हिशोब द्यावा लागेल, असेही पटोले म्हणाले.