उदगीर : प्रतिनिधी
आयुष्याला योग्य दिशा देण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती करा व जीवनात प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशस्वी व्हायचे असेल तर पुस्तकांवर प्रेम करा पुस्तके तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील आयुष्यात जर काही बनायचे असेल तर मेहनतीशिवाय पर्याय नाही. वाटेत अनेक खाचखळगे लागतील पण त्यावरही तुम्हाला स्वत:च्या हिमतीवर निश्चितच मात करता येईल असे मत सहाय्यक पोलीस निरीक्षक अनुपमा केंद्रे यांनी मुलींना समुपदेशित करताना मांडले.
येथील लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयात विशाखा समिती अंतर्गत किशोरवयीन मुलींच्या समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विशेष अतिथी व मार्गदर्शक म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक अनुपमा केंद्रे उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या विशाखा समितीच्या अध्यक्ष मोहिनी आचोले तर विशेष उपस्थिती विद्यालयाचे मुख्याध्यापक अनंतराम कोपले, उपमुख्याध्यापक अरुण पत्की, पर्यवेक्षक कृष्णा मारावार, किरण नेमट यांची लाभली होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी विशाखा समितीच्या सचिव अनिता यलमटे यांनी विशाखा समितीच्या माध्यमातून वर्षभर राबवल्या जाणा-या उपक्रमाची माहिती व समुपदेशनाची गरज प्रास्ताविकातून नमूद केली.
सोशल मीडियातून होणा-या फसवणुकीबद्दल व गैरवापराबद्दल अनेक उदाहरणे सांगत मुलींनी नैतिक बळ ठेवावे असे आवाहन अध्यक्षीय समारोपात मोहिनी आचोले यांनी केले. सध्या समाजात सोशल मिडीयावरून गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. आपण मोबाईल व इतर सोशल मिडीयाचा गैरवापर न करता चांगली पुस्तके वाचा. वाम मार्गाला न जाता विशिष्ट ध्येयापर्यंत पोहोचावे असा संदेश त्यांनी मुलींना दिला .
यावेळी मुलींनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनुपमा केंद्रे यांना अनेक प्रश्न विचारून मुलींच्या सुरक्षितते संदर्भात असणा-या कायद्याची व सोयी सुविधांची माहिती जाणून घेतली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाखा समिती सदस्य लक्ष्मी चव्हाण तर आभार प्रदर्शन सुरेखा शिंदे, कल्याण मंत्र प्रीती शेंडे यांनी सादर केले. तसेचया कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशाखा समिती सदस्य शोभा नेत्रगावकर, अनिता मुळखेडे, प्रमोदिनी रेड्डी यांनी परिश्रम घेतले.