27.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeराष्ट्रीयमुस्लिम आरक्षणाच्या निर्णयाचा फेरआढावा घेणार

मुस्लिम आरक्षणाच्या निर्णयाचा फेरआढावा घेणार

राजस्थानमधील भाजप सरकारची घोषणा

जयपूर : राजस्थानातील याआधीच्या काँग्रेस सरकारने मुस्लिमांमधील १४ जातींचा मागासवर्गीयांमध्ये समावेश करून त्यांना आरक्षण दिले होते. त्या निर्णयाचा फेरआढावा घेतला जाईल असे राजस्थानचे सामाजिक न्याय व पर्यावरण खात्याचे मंत्री अविनाश गेहलोत यांनी शनिवारी सांगितले. ते म्हणाले की, यााआधीच्या काँग्रेस सरकारने मुस्लिमांमधील काही जातींना मागासवर्गीय गटांसाठीचे आरक्षण १९९७ ते २०१३ या कालावधीपर्यंत दिले होते. काँग्रेसने विशिष्ट लोकांचे लांगूलचालन करण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाचा फेरआढावा घेतला जाणार आहे.

कोणत्याही जाती किंवा वर्गाला धर्माच्या आधारावर आरक्षण देता येणार नाही, असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते. पण तरीही काँग्रेसने मुस्लिम धर्मातील जातींचा मागासवर्गीयांमध्ये समावेश केला. त्याविरोधात आमच्या सरकारकडे तक्रारी दाखल झाल्या आहेत. धर्माच्या आधारे आरक्षण हे घटनाबा आहे. त्यामुळे या निर्णयाचा फेरआढावा घेण्यात येईल असे अविनाश गेहलोत म्हणाले.

पराभवाच्या भीतीने भाजपची खेळी : डोटासरा
काँग्रेस नेते गोविंद सिंह डोटासरा यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकांमध्ये आपला पराभव होईल या भीतीने भाजपने हिंदूू-मुस्लिम हा विषय प्रचारात आणला आहे. केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षांत केलेल्या कामगिरीबद्दल भाजप काहीही बोलायला तयार नाही. लोकसभा निवडणुकांत इंडिया आघाडी जिंकणार आहे. मोदी सरकारच्या गेल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात महागाई, बेकारी वाढली असून देशात अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप गोविंद डोटासरा यांनी केला.

तर एआयएमआयएम आंदोलन करणार
मुस्लिमांमधील काही जातींना मागासवर्गीयांतील दिलेल्या आरक्षणाचा फेरआढावा घेण्यात आला तर त्याविरोधात आम्ही आंदोलन करू. एका धर्माला लक्ष्य करण्याऐवजी भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्याचाच एकदा फेरआढावा घ्यावा असे एआयएमआयएमचे राजस्थानचे सरचिटणीस कासिफ झुबेरी यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR