26.2 C
Latur
Friday, December 13, 2024
Homeमहाराष्ट्रमृत महिलेची मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न; भोंदूबाबाला अटक

मृत महिलेची मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न; भोंदूबाबाला अटक

सातारा : प्रतिनिधी
मालमत्ता बळकावण्याच्या उद्देशाने वृद्ध नागरिकांना फसवणा-या भोंदूबाबाला दहिवडी पोलिसांनी गजाआड केलं आहे. एकनाथ रघुनाथ शिंदे असे भोंदूबाबाच नाव आहे. तो जळगाव जिल्ह्यातील ओझर इथला रहिवासी आहे. मृत महिलेचा २७ वर्षांपूर्वी घरातून निघून गेलेला मुलगा मीच आहे, असं भासवून वृद्धेची मालमत्ता बळकावण्याचा त्याचा प्रयत्न होता. मात्र, नातेवाईकांच्या सतर्कतेमुळे तो फसला आणि भोंदूबाबाच्या हातात बेड्या पडल्या.

माण तालुक्यातील शिंदी बुद्रुक गावातील व्दारकाबाई विष्णू कुचेकर यांचा मुलगा सोमनाथ हा इयत्ता ८ वी मध्ये असताना १९९७ साली घरातून निघून गेला. आपला मुलगा कधी तरी परत येईल, या आशेवर ती जगत होती. मागील नऊ-दहा वर्षांपासून एकनाथ शिंदे हा भोंदूबाबा भिक्षा मागण्यासाठी गावात येत होता. या दरम्यान त्यानं व्दारकाबाईच्या कुटुंबाची आणि मालमत्तेची माहिती घेतली. तिचा मुलगा घर सोडून गेला असून तिला तीन एकर जमीन असल्याचे त्याला समजले.

एकनाथ शिंदे हा वद्धेला वरचेवर भेटून मीच तुमचा मुलगा असल्याचे सांगत होता. अशातच ९ डिसेंबर २०२३ रोजी वृद्धापकाळाने द्वारकाबाईंचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी २७ नोव्हेंबर २०२४ रोजी त्यांचं वर्षश्राद्धही घातले. त्यानंतर मुलगा या नात्याने ११ डिसेंबर २०२४ ला तिचे वर्षश्राद्ध घालण्याचे भोंदूबाबाने ठरवले. ही माहिती कळताच नातेवाईक त्याठिकाणी पोहोचले. त्यांना भोंदबाबाचा संशय आल्याने त्यांनी पोलिसांना कळवले.

दहिवडी पोलिसांनी भोंदूबाबाला ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच आपले खरे नाव एकनाथ रघुनाथ शिंदे असल्याचे त्याने सांगितलं. तसंच व्दारकाबाईच्या नावे असलेली तीन एकर जमीन बळकावण्याच्या हेतूने तिचा मुलगा सोमनाथ कुचेकर याची कागदपत्रे काढली. त्याचा फोटो, नाव, पत्ता वापरुन आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक खाते, एटीएम काढल्याची कबुलीही दिली. दहिवडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून भोंदूबाबाला गजाआड केलं. आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR