लातूर : प्रतिनिधी
शहराच्या भाजी मंडईत भाजीपाला मोठ्या प्रमाणात येत आहे. त्यात पालेभाज्याची आवक प्रचंड वाढली आहे. मेथी भाजीची आवक सर्वाधिक आहे. त्यामुळे दिवसभर १० रुपये आणि सायंकाळी चार-पाच रुपयांना मिळाणा-या मेथीने इतर भाज्यांचा बाजारच उठवला आहे. पाच-दहा रुपयांचे मेथी भाजी, दहा रुपयांच्या हिरव्या मिरच्या, असे वीस-पंचेवीस रुपयांत भाजीचा विषय मिटत असल्याने नागरिक २० रुपये, ३० रुपये, ४० रुपये पावकिलो, असा भाव असलेल्या भाज्यांकडे ढूूंकूनही बघत नसल्याने मेथी वगळता इतर भाज्याचा बाजारच उठल्याचे सध्याचे चित्र आहे.
गेल्या पंधरा दिवसापासून उन्हाचा तडाखा वाढत असताना हिरव्या पालेभाज्यांचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे सध्या शहरातील महात्मा फुले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात लिलावासाठी येणा-या पालेभाज्यांची आवक मोठया प्रमाणात वाढली आहे. दर्जेदार पालेभाज्या वगळता इतर पालेभाज्यांना चांगले दर मिळत नसल्यामुळे शेतापासून बाजारापर्यंत पालेभाज्या आणणेदेखील शेतक-यांना परवडत नसल्याची व्यथा शेतकरी व्यक्त करीत आहेत. लातूर जिल्हाभरात पाऊस चांगला झालेला असल्यामुळे सिंचनासाठी मुबलक पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे पाण्याची आवश्यकता जास्त असलेल्या आणि कमी कालावधीत काढणीसाठी तयार होणा-या पालेभाज्यांची लागवड वाढलेली आहे.
चांगल्या दर्जाच्या गावठी कोथिंबीराला बरे दर मिळत असले तरी कोथिंबीरीच्या संकरित वाणाकडे ग्राहक कानाडोळा करीत आहेत. त्यामुळे संकरित वाणाच्या कोथिंबीरीला लिलावात ३ ते ६ रुपये प्रतिजुडी असा नाममात्र दर मिळत आहे. शहरातील बाजारात ग्रामीण भागासह शेजारी जिल्ह्यातून आवक वाढलेली असल्याचे बाजार समितीत व्यापा-यांनी सागीतले. ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर पालेभाज्याची आवक होत असून सध्या बाजारात पालेभाज्यांना चागल्या प्रतिचा भाव मिळत आहे. शहरातील बाजार समितीत गेल्या आठवड्याच्या तूलनेत २० टक्यांनी वाढ झाली असल्याचे दिसून आली. बाजारात मेथीची आवक सर्वाधिक होत आहे. तर शेपू आणि कांदापात यांची स्थिती बरी असल्याचे लिलावात त्यांना मिळणा-या दरावरून जाणवत आहे. त्यात त्यांची आवक कमी असल्यामुळे आणि मागणी टिकून असल्यामुळे दरही टिकून आहे.
शहरातील बाजारात कोंथिबीर, मेथी, काकडी, मिरची, दोडका आदी पालेभाज्या २० ते ३० रुपये प्रति किलो दराने विकली जात होती. सध्या थंडीची लाट पसरल्यामुळे भाजीपाला पिकांना पोषक वातावरण तयार झाल्याने, त्यांच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे बाजार समितीत भाजीपाल्याची आवक वाढल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र गेल्या आठ दिवसांपासून किरकोळ बाजापेठेत भाजीपाल्याच्या दरात घसरण होत आहे. मागील काही महिन्यांत भाज्यांचे दर वधारलेले पाहायला मिळत होते. भाज्यांच्या वाढलेल्या दराने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत होती. मात्र सध्या लातूर जिल्ह्यात भाज्याचे दर कमी झालेले आहेत. भाज्यांचे दर कमी झाल्याने सर्वसामान्यांना थंडीत वेगवेगळया भाज्यांचा आस्वाद घेता येत आहे.