27.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeराष्ट्रीयमोदींची वाराणसीत हॅट्ट्रिक होणार?

मोदींची वाराणसीत हॅट्ट्रिक होणार?

वाराणसी : वृत्तसंस्था
एरवी भाविक आणि पर्यटकांची गजबज राहणा-या काशी (वाराणसी) येथे सध्या राजकीय धुरंधरांची गजबज आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोंदींच्या या मतदारसंघात शेवटच्या टप्प्यात १ जून रोजी मतदान होणार आहे. पंतप्रधानांसमोर काँग्रेसचे अजय राय आणि बसपाचे अथर जमाल लारी यांच्यासह सहा उमेदवार आहेत. निकाल मतदार ठरविणार असले तरी पंतप्रधान मोदी येथून हॅट्ट्रिक साजरी करतील हे निश्चित मानले जात आहे, फक्त मताधिक्य किती असेल, ते वाढेल की घटेल हाच प्रश्न आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील मतदान एक जूनला होणार आहे. या टप्प्यात सर्वाधिक हायप्रोफाईल मतदारसंघ असलेल्या वाराणसी या मतदारसंघातही मतदान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा मतदारसंघ असून त्यांच्याविरोधात काँग्रेसचे अजय राय उमेदवार आहेत. त्याचप्रमाणे पुर्वांचलमधील इतर सात मतदारसंघांतही मतदान होणार असल्याने भाजपसह काँग्रेसचे देशभरातील बडे नेते, मंत्री, पदाधिकारी मागील काही दिवसांपासून काशीमध्ये दाखल झाले आहेत. वाराणसीसह लगतच्या आठ मतदारसंघांमध्ये दिवसभर प्रचारसभा, बैठका, रोड शो सुरू आहेत. हे मतदारसंघ हायप्रोफाईल असल्याने सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे येथील बहुतेक हॉटेल, वाहने बुक झाली असून पॉलिटिकल टुरिझमचे चित्र निर्माण झाले आहे.

गेल्या दोन्ही वेळा लोकसभा निवडणुकीत मोदींचे विजयाचे अंतर वाढलेले आहे. २०१९ मध्ये ते ४,७९,५०५ मतांनी निवडून आले होते. २०१४ पेक्षा हे मताधिक्य एक लाखांहूनही अधिक होते. आता ते अंतर पाच लाखांच्यावर राहील का, याचीच उत्सुकता आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे
आपल्या देशभराच्या प्रचार कार्यक्रमातही मोंदींनी आपल्या मतदारसंघाला वेळ देता येईल असे नियोजन केलेले आहे. ते मतदारांशी संपर्क साधत आहेत. आपल्या सर्वांच्या प्रेमाने मला बनारसी बनवले आहे. मी इथला केवळ खासदारच नाही तर स्वत:ला काशीचाच पुत्र मानतो असा भावनिक मुद्दा त्यांनी मांडला आहे. या मतदारसंघात तब्बल ३३ इच्छुक उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद ठरविण्यात आल्यानंतर आठ उमेदवारांनी यात काहीतरी गडबड असल्याचा आरोप केला होता.

५०० हून अधिक खोल्यांचे बुकिंग
अनेक बड्या नेत्यांची काशीमध्ये ये-जा सुरू असल्याने बहुतेक मोठ्या हॉटेलचे जवळपास ५०० हून अधिक खोल्यांचे बुकिंग फुल आहे. खासकरून छावणी क्षेत्रातील हॉटेलला पसंती मिळत आहे. नेत्यांचे प्रतिनिधी व समर्थकांसाठी घाट किना-यावरील हॉटेल बुक आहेत. मागील दहा दिवसांत मोठ्या ३०० हॉटेलचा व्यवसाय चांगलाच तेजीत आहे. एवढेच नाही तर नेते, कार्यकर्त्यांना ये-जा करण्यासाठी सुमारे १२०० लक्झरी वाहनेही दिमतीला आहेत. मागील दहा दिवसांत हॉटेल व्यवसाय चांगलाच तेजीत आहे. शहरातील सुमारे १२०० लक्झरी वाहने एक जूनपर्यंत बड्या नेत्यांसाठी बुक आहेत. अनेक वाहने लखनौ येथून मागविण्यात आली आहेत. इतरदिवशी केवळ १०० वाहनांची मागणी असते. पण सध्या त्यामध्ये १० पटींनी वाढ झाली आहे. बस, ट्रॅव्हल्स, लक्झरी कार अशा सर्वच गाड्यांना मागणी आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR