मुंबई : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जमशेदपूरच्या दौ-यावर असताना झारखंडमधील ‘लाडकी बहीण’ योजनेवर टीका केली. ही योजना बोगस असल्याचे विधान पंतप्रधानांनी केले होते. त्यांच्या या विधानावर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे की काय अशी टीका केली आहे.
दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी सोमवारी (ता. १६ सप्टेंबर) प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. याचवेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. प्रसार माध्यमांसमोर खासदार संजय राऊत म्हणाले की, मला पंतप्रधान पदाबाबत आदर आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आता काय बोलतील हे माहीत नाही. त्यांचे मानसिक संतुलन कळत नाही. त्यांचे मन सडलेले आहे.
झारखंडमध्ये जर कोणतीही योजना चुकीची असेल तर महाराष्ट्रात ते कसे योग्य आहे? मोदी दोन राज्यांमध्ये दुजाभाव करतात. पंतप्रधान झारखंडमधील लाडक्या बहीण योजनेला बोगस, भंपक बोलतात. पण दुस-या राज्यातील लोक लाडकी बहीण योजना काढतात तेव्हा त्यांना बोगस म्हणतात. झारखंड सरकारने ही योजना काढली तर त्याला पंतप्रधान मोदींनी बोगस म्हटले. पण सगळ्यात जास्त बोगस योजना तर महाराष्ट्रात सुरू आहेत, अशी टीका राऊतांनी केली आहे.
यावेळी खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत मिळालेल्या बंगल्यावरून भाष्य करत म्हटले की, देवेंद्र फडणवीस जातात तिकडे त्यांना बंगला मिळत आहे. त्यांचे आणि बंगल्याचे काय रहस्य आहे हे मला कळलेले नाही. महाराष्ट्रात मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना एकच बंगला मिळतो. इथे तर त्यांनी तीन तीन बंगले घेतले आहेत. मुख्यमंत्र्यांनी तीन बंगले घेतलेत. दिल्लीत बंगला वाटप सुरू आहे. पण त्याचा एकदा ‘भूत बंगला’ होणार आहे. एवढे बंगले घेतले आहेत. निवडणूक हरल्यावर सर्व भुतासारखे फिरणार आहेत. मला कळत नाही यांना एवढे बंगले का देत आहेत? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.