22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमोदी, शहांना टेन्शन; नितीश-नायडूंचा भाजपवर दबाव!

मोदी, शहांना टेन्शन; नितीश-नायडूंचा भाजपवर दबाव!

नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी
लोकसभा-२०२४ या निवडणुकीत बहुमतासाठी मॅजिक फिगर गाठताना भाजपची अक्षरश: दमछाक झाली. तर भाजपच्या नेतृत्वातील ‘एनडीए’ने २९२ जागा मिळविल्या. इंडिया आघाडीने अनपेक्षित कामगिरी करीत २३४ जागांवर विजयाची मोहर उमटवली. निकालानंतर एनडीए सरकार सत्तास्थानी असेल असे स्पष्ट दिसत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने २०१४ आणि २०१९ मध्ये सहज बहुमत मिळविले होते. एका दशकात पहिल्यांदा भाजपला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठताना दम लागला. त्यामुळे आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे नितीश कुमार यांना किंगमेकर मानले जात आहे. त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष १९९६ मध्ये पहिल्यांदा एनडीएमध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी त्यांचे सरकार आयटी गव्हर्नंससाठी ओळखले गेले. पण २०१८ मध्ये त्यांनी ‘एनडीए’ला रामराम ठोकला. त्याचा त्यांच्या पक्षाला मोठा फटका बसला. २०१८ मध्ये तेलंगणा विधानसभा निवडणुकीत टीडीपीला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले. तर २०१९ मध्ये आंध्रप्रदेशातील विधानसभा निवडणुकीत त्यांना केवळ २३ जागांवर समाधान मानावे लागले होते.

यावर्षी फेब्रुवारीमध्ये ‘टीडीपी’ने पुन्हा एकदा ‘एनडीए’ची वाट धरली. त्याचा फायदा पक्षाला विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत दिसून आला. चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाने आंध्र प्रदेश विधानसभेतील १७५ पैकी १३५ जागांवर विजय मिळवला. तर लोकसभेच्या १६ जागा सहजगत्या खिशात घातल्या. त्यामुळे नायडू दोन दशकात पहिल्यांदा किंगमेकरच्या भुमिकेत पुढे आले आहेत.

दरम्यान, सत्तास्पर्धेत इंडिया आघाडीची बाजू मजबूत करण्यासाठी चंद्रबाबू नायडू यांच्याशी संपर्क साधण्याची जबाबदारी अखिलेश यादव यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डीही चंद्राबाबू नायडू यांच्याशी संपर्क साधणार आहेत. इंडिया आघाडीत कदाचित चांगल्या पदाची, मंत्रालयाची ऑफर त्यांना देण्यात येऊ शकते.

तथापि, चंद्राबाबू नायडू यांनी लोकसभा अध्यक्षपदाची ‘एनडीए’कडे मागणी केली आहे. काही खास मंत्रालय पण पदरात पाडून घेण्यासाठी दबावतंत्राचा वापर ते करू शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार नायडू आणि नितीश कुमार यांची भूमिका भाजपचे टेन्शन वाढवू शकते.

गेल्या वर्षांच्या अखेरीस नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीची मोट बांधली होती. ते पंतप्रधान पदाचे संभाव्य दावेदार होते. पण लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच त्यांनी ‘एनडीए’मध्ये उडी घेतली. कधी भाजपच्या मळ्यात तर कधी काँग्रेसच्या तळ्यात असा त्यांचा दोन्ही पक्षांशी घरोबा आहे. पण राजकारणात त्यांना नाकारुन मोठ्या पक्षांना पुढे जाता येत नाही हे पण तितकेच खरे. २०२२ मध्ये नितीश कुमार यांनी लालप्रसाद यादव आणि इतरांसोबत मिळून महागठबंधनचा प्रयोग केला होता. त्यानंतर इंडिया आघाडीच्या प्रयोगाचे निमंत्रण त्यांनीच धाडले होते. पण २०२४ मध्ये त्यांनी भूमिका बदलली. लोकसभेत १२ जागा ज्ािंकून नितीश कुमार यांनी राजकारणातील त्यांचा मुरब्बीपणा दाखवून दिला. त्या जोरावर ते चंद्राबाबू नायडूसारखेच किंगमेकर ठरले आहेत. फायदा आणि नुकसानीची भीती नितीश कुमार यांना नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे. त्यामुळे एनडीएत कायम राहतात की इंडिया आघाडीत सहभागी होतात, हे लवकरच दिसून येईल.

लोकसभा अध्यक्षपदावर दावा…
चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार ‘एनडीए’ आघाडीवर दबाव तंत्राचा वापर करत असल्याचे समजते. लोकसभा अध्यक्षपदासाठी दोन्ही पक्ष आग्रही आहेत. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार दोघेही लोकसभा अध्यक्षपदाची मागणी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पंतप्रधान मोदी आणि भाजप ही मागणी मान्य करणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR