18.8 C
Latur
Thursday, January 16, 2025

मोदी ३.०

मोदींसोबत अनेक नेते मंत्रिपदाची शपथ घेणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात आता एनडीएचे सरकार सत्तेवर येणार असून, एनडीएचे गटनेते म्हणून नरेंद्र मोदी यांची निवड झाल्याने आता ते रविवार, दि. ९ जून रोजी सायंकाळी ७.१५ वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मोदी तिस-यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊन देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रमाची बरोबरी करणार आहेत. यावेळी मोदींसोबत जवळपास ५२ ते ५५ मंत्री शपथ घेऊ शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे. यामध्ये १९ ते २२ कॅबिनेट मंत्री तर ३३ ते ३५ राज्यमंत्र्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

सलग तिस-यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्यासाठी नरेंद्र मोदी सज्ज झाले आहेत. यावेळी भाजपने बहुमताचा आकडा गाठला नसल्याने एनडीतल्या मित्रपक्षांच्या मंत्रिमंडळात जागा वाढणार आहेत. एनडीए आघाडीतील टीडीपी, जेडीयू, एलजेपीसह आरएलडी, जनसेना, जेडीएस आणि अपना एनडीएचे घटक म्हणून सरकारमध्ये सामील होऊ शकतात. यात टीडीपीला कॅबिनेट, दोन राज्यमंत्रिपदे मिळू शकतात तर जेडीयूला कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपद मिळू शकते. शिवसेना, एलजेपी, आरएलडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी एक मंत्री सरकारमध्ये सामील होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, शिंदेंच्या शिवसेनेने दोन कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रिपदाची मागणी केली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एक कॅबिनेट आणि एका राज्यमंत्रिपदाची मागणी केल्याचे समजते.

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात जातीपेक्षा प्रादेशिक समतोलावर भर दिला जाणार आहे. मंत्रिमंडळात उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम भागातील खासदारांना संधी मिळणार आहे. मंत्र्यांची निवड करताना त्यांचा अनुभव आणि शिक्षणही विचारात घेतले जात आहे.एनडीएमध्ये भाजपनंतर चंद्राबाबूंच्या तेलुगु देसम आणि नितीशकुमारांच्या जेडीयूचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळे तेलुगु देसमला ४, जेडीयूला ४, लोकजनशक्ती पार्टीला २ मंत्रिपदे मिळू शकतात. तेलुगु देसम आणि जेडीयू अर्थमंत्रालयासह सभापतीपदाची मागणी करत असल्याचे समजते मात्र संरक्षण, अर्थ, गृह आणि परराष्ट्र मंत्रालय भाजप स्वत:कडे ठेवणार असल्याची माहिती आहे.

७ हजार लोकांना निमंत्रण
नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ््यासाठी ७ हजार लोकांना निमंत्रण देण्यात आले आहे. यासोबतच अनेक देशांचे प्रतिनिधीही सहभागी होणार आहेत. त्यामुळे दिल्लीत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच दिल्लीला नो फ्लाईंग झोन घोषित करण्यात आले आहे. तसेच राज्यभर पोलिसांचा पहारा राहणार आहे.

या देशाचे प्रमुख राहणार उपस्थित
बांगलादेश, श्रीलंका, मालदीव, भूतान, नेपाळ मॉरिशस आणि सेशेल्स या देशांचे प्रमुख नेते मोदींच्या शपथविधी सोहळ््याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. बांगला देशच्या पंतप्रधान शेख हसिना, मालदीवचे अध्यक्ष मोहमद मुईज्जू, भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबवेग, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ आणि सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष वावेल रामखेलावान यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR