जळकोट : ओमकार सोनटक्के
वीज कंपनीतर्फे शहरात प्रीपेड वीज मीटर बसविले जाणार आहेत. मोबाईल व डिश टीव्हीप्रमाणे रिचार्ज करा आणि वीज वापरा या संकल्पनेवर हे मीटर काम करेल. पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर शासकीय वसाहती कार्यालयांमध्ये ते बसवले जाईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने मागणीनुसार घरगुती व्यावसायिक ग्राहकांकडे हे मीटर लावण्यात येणार आहेत .
विजेची बचत म्हणजेच विजेची निर्मिती असे सातत्याने सांगण्यात येत असले तरी शासकीय कार्यालयांसह सार्वजनिक ठिकाणी सर्रास विजेची उधळपट्टी होताना दिसते. घरातही अनेकवेळा अनावश्यक विजेचा वापर होतो. जास्त वीजबिल आल्यावर इतके बिल आलेच कसे यावरून वाद होतात. वीजबिल कमी यावे यासाठी अनेक जण मीटरमध्ये फेरफार करतात. त्यामुळे वीज कंपनीतर्फे वीजचोरी थांबवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
या उपाययोजनेचा एक भाग म्हणून वीज कंपनीतर्फे आता शहरात प्रीपेड वीज मीटर बसवले जाणार आहे. हे मीटर बसवल्यानंतर जितक्या रकमेचे रिचार्ज केले असेल तितकीच वीज वापरता येईल. रिचार्ज संपण्यापूर्वी ग्राहकांना सूचना मिळेल. हे मीटर बसवल्यानंतर चुकीचे मीटर रीडिंग घेतले, वीजबिल वेळेत मिळाले नाही अशा तक्रारी थांबतील. तसेच वीज चोरीलाही पायबंद बसेल. मुदतीत मीटर रिचार्ज केले नाही तर आपोआप वीजपुरवठा खंडित होईल. त्यामुळे ग्राहकांना मुदतीपूर्वीच मीटर रिचार्ज करावे लागेल.
पहिल्या टप्प्यात शासकीय वसाहतींमध्ये तसेच विविध सरकारी कार्यालयामध्ये हे मीटर बसविण्यात येणार आहेत. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर ग्राहकांना मागणीप्रमाणे मीटर दिले जाईल. शासकीय वसाहतींमध्ये कर्मचा-यांच्या बदल्या झाल्यानंतर नव्याने राहण्यास आलेला कर्मचारी वीजबिल भरण्यास टाळाटाळ करतो. परिणामी थकबाकी वाढते. हा भार वीज कंपनीला सहन करावा लागतो. त्यावर पर्याय म्हणून शासकीय कार्यालयामध्ये प्रीपेड मीटर बसविण्यात येणार आहेत.