लातूर : प्रतिनिधी
लातूर येथील एका नामांकीत अशा महाविद्यालयामध्ये असलेल्या परिक्षा केंद्रात विद्यार्थी परिक्षा देत असताना वर्गाबाहेर ठेवण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या मोबाईल व इतर साहित्य असलेल्या बॅगा चोरणा-या टोळीस स्थानीक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने मोठ्या शिताफीने तपास करून पकडले असून त्यांच्याकडून या बॅगा व २० मोबाईल असा एकूण १ लाख ५९ हजार रूपयांचा ऐवज जप्त केला आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या या महाविद्यालयात परिक्षा होत असताना विद्यार्थ्यांनी परिक्षा केंद्राबाहेर आपल्या बॅगमध्ये ठेवलेल्या मोबाईल व इतर साहित्यासह त्या बॅगा चोरून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पोलीस पथकाने मोठ्या शिताफीने तसेच सायबर शाखेची मदत घेवून विद्यार्थ्यांचे मोबाईल पळविणा-या तिघा जणांना ते चोरलेले मोबाईल स्वस्तात विकण्याच्या प्रयत्नात असताना अटक करून त्यांच्याकडून १ लाख ५९ हजार रूपयांचा ऐवज जप्त केला आहे.
पोलिसांनी ऋष्षीकेश उर्फ भुज्या सुरेश कुरे रा. राजे शिवाजीनगर पाखरसांगवी, दिनेश दयानंद पवार रा. हरंगुळ बु. व सोमेश राम हिप्परगे रा. मुरूड हा मु. विक्रमनगर लातूर यांना अटक केली आहे. या उत्कृष्ट तपासकामात वरिष्ठांच्या नेतृत्वात स्थानीक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकातील नवनाथ हासबे, माधव बिलापट्टे, राजेश कंचे, राजु मस्के, तुराब पठाण, प्रदीप स्वामी, जमीर शेख, नकुल पाटील यांनी परिश्रम घेतले.