मुंबई : प्रतिनिधी
नुकतेच नागपूर येथे हिवाळी अधिवेशन पार पडले. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं रंगरंगोटी किंवा सुशोभीकरणासाठी काही खर्च करण्यात येतो. हा खर्च सरकारनं ५५ टक्क्यांनी कमी केला आहे.
दरम्यान, महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा लाभ महिलांना मिळण्यास सुरूवात झाली आहे. पात्र असलेल्या महिलांच्या बँक खात्यात १५०० रूपये पाठवण्यात येत आहेत. ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण पडताना दिसत आहे.
त्यामुळे सरकारकडून शासकीय खर्चांना खात्री लावण्यात येत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आकडेवारीनुसार मुख्यमंत्री निवास असलेल्या रामगिरी बंगल्यावर ३४.७१ लाख, मंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या रवीभवन येथील बंगल्यांवर १.०३ कोटी, नागभवन ८.४० आणि उपमुख्यमंत्री निवास असलेल्या देवगिरी बंगल्यावर ३८.४१ लाख खर्च करण्यात आला. जुने हैदराबाद हाऊस ३३.०५ लाख, नवीन हैदराबाद हाऊस २०.०८ आणि आमदार निवासला ३८.७९ लाख रूपये करण्यात आलेल्या खर्चाचाही समावेश आहे.
२०२१-२२ आणि २०२२-२३ च्या तुलनेत यंदाच्या हिवाळी अधिवेशनात ५५ टक्के कमी खर्च करण्यात आला आहे. ऊर्जा विभाग, समाजकल्याण विभाग, क्रीडा विभागाच्या वाजवी खर्चांनाही कात्री लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासह रंगरंगोटी आणि सरकारची कार्यक्रमांच्या खर्चातही कपात होण्याची शक्यता आहे.
शासनाकडून काटकसर
राज्य सरकारवर तब्बल ९ लाख कोटींच्या आसपास कर्ज आहे. त्यातच ‘लाडकी बहीण योजने’मुळे ४० हजार कोटींचा भार पडू शकतो. त्यामुळे सरकारकडून काटकसर करण्यात येत आहे.