पुणे : प्रतिनिधी
सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, एमआयटी-एडीटी विद्यापीठ, पुणे येथील नाट्य विभाग आणि दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने राज कपूर नाट्यगृह, पुणे येथे झालेल्या ‘रंग रूपक’ या तीन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादात भारतीय नाट्य शास्त्रावर अतिशय मौलिक मंथन पार पडले. ‘रंग रूपक’ हा परिसंवाद नाट्य रसिकांसाठी पर्वणीच ठरला.
भारतीय ज्ञान परंपरेतील नाट्य संस्कृतीचा प्रसार व्हावा या हेतूने भारतीय ज्ञान परंपरेतील नाट्यशास्त्राची भूमिका ही विषयवस्तू घेऊन आयोजित या परिसंवादात राष्ट्रीय स्तरावरील नामांकित नाट्य दिग्दर्शक/नाट्यकर्मी यांनी तीन दिवस विद्यार्थी व सहभागींना मार्गदर्शन केले. या परिसंवादाचे उद्घाटन, राष्ट्रीय नाट्य विद्यालय, नवी दिल्लीचे माजी संचालक पद्मश्री प्रा. वामन केंद्रे, राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे कार्यकारी अध्यक्ष पद्मश्री प्रा. भरत गुप्त, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., कुलसचिव डॉ. महेश चोपडे, संस्कार भारतीचे अभिजित गोखले, सिनेनाट्य विभागाचे अधिष्ठाता डॉ. मुकेश शर्मा, आयोजक डॉ. अमोल देशमुख यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
उद्घाटन सोहळ्याची सुरुवात जर्जर ध्वज पूजन आणि संबळ वादनाने झाली. यानंतर रंगमंचावर नटराज पूजन होऊन अंगवस्त्र व संत ज्ञानेश्वर प्रतिमा देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकतेतून नाट्यशास्त्रातील भारतीयत्व आणि स्वत्वचा विचार या परिसंवादाची प्रेरणा असल्याचे वक्तव्य परिसंवाद संयोजक व नाट्य विभागप्रमुख डॉ. अमोल देशमुख यांनी केले. पहिल्या दिवसाप्रमाणेच परिसंवादाचा दुसरा दिवसही कला क्षेत्रातील विद्यार्थी, अभ्यासकांसाठी पर्वणी ठरला.