नांदेड : विशेष प्रतिनिधी
नांदेड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत असून दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांचे सुपुत्र प्रा. रविंद्र चव्हाण यांच्या उमेदवारीवर आज कॉँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी शिक्कामोर्तब केले. कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रा. रविंद्र चव्हाण यांच्या उमेदवारीस संमती दिली असल्याची माहिती कॉँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी दिली.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसोबतच या लोकसभा मतदार संघात पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे काँग्रेसने ही जागा लढविण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. वसंत चव्हाण यांच्या मुलालाच लोकसभेची उमेदवारी देण्याच्या हालचाली जिल्हा काँग्रेसमध्ये सुरू होत्या. आता भाजप काय निर्णय घेते? भाजप उमेदवार देणार की नांदेड लोकसभा पोटनिवडणूक बिनविरोध होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांचे पुत्र प्रा. रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिल्यास मतदारांची सहानुभूती मिळू शकते. परिणामी रवींद्र चव्हाण यांचा सहज विजय होऊ शकतो, असा पक्ष नेत्यांचा अंदाज आहे. काँग्रेसचे राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली त्यात प्रा. रवींद्र चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
प्रा. रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिल्यास मतदारांची सहानुभूती मिळेल. त्यामुळे चव्हाण यांचा विजय सोपा जाईल. शिवाय रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिल्यास भाजपकडून कदाचित उमेदवार दिला जाणार नाही, त्यामुळे निवडणूक बिनविरोध होऊ शकते. तसेच चव्हाण यांच्या कुटुंबाव्यतिरिक्त पक्षातून इतर उमेदवार दिल्यास भाजपकडून नांदेडमध्ये उमेदवार दिला जाईल. शिवाय मतदारांची सहानुभूतीची लाट राहणार नाही. त्यामुळे ही निवडणूक काँग्रेसला जड जाऊ शकते, असे काँग्रेसच्या काही नेत्यांचे म्हणणे होते.