सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
मालवणमधील सिंधुदुर्ग राजकोट किल्ल्यावर असलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याची घटना आज दुपारी घडली. पुतळा कोसळल्याने शिवप्रेमी संतत्प झाले आहेत. ४ डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. निकृष्ट बांधकामामुळे हा शिवरायांचा पुतळा कोसळ्याचाा आरोप शिवप्रेमी करत आहेत. येथील शिवपुतळा परिसर सुशोभीकरणासाठी सुमारे ५ कोटी रुपये खर्च करण्यात आला होता.
राजकोट येथील शिवपुतळा संकुलाचे सुशोभीकरण व इतर व्यवस्थेसाठी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कणकवली यांच्या कार्यालयाकडून सुमारे ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. राज्य सरकार आणि नौदल विभागाने निर्णय घेतल्यानंतरच राजकोट येथे पुतळा उभारण्याचे काम सुरू झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुमारे ४३ फूट उंच आहे. जमिनी पासून बांधकाम १५ फूट तर त्यावर २८ फूट उंच हा पुतळा उभारण्यात आला होता.
दोषींवर कारवाई करा: वैभव नाईक
दरम्यान, या घटनेवर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक म्हणाले की, शिवाची महाराजांचा पुतळ हा निकृष्ट कामामुळे कोसळल आहे. याबद्दल आम्हाला दु:ख होत असून, एक शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो. सहा महिन्यांपूर्वी कोट्यावधी रुपये खर्च करून हा पुतळा उभरण्यात आला होता . ज्यावेळी काम सुरू होते त्यावेळी स्थानिक लोकांनी सुद्धा कामासंदर्भात तक्रारी केल्या होत्या. ४०० वषार्पूर्वी उभारण्यात आलेल्या किल्ल्याचा एकही चिरा ढासळला नाही, पण सहा महिन्यांपूर्वी बांधण्यात आलेला पुतळा ढासाळला. या प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल झाले पाहिजे अन्यथा आम्ही राज्यभर आंदोलन करू. तसेच सर्व शिवप्रेमींनी शांततेत आंदोलन करावे, असे आमदार वैभव नाईक म्हणाले.