सांगली : प्रतिनिधी
राज्यातील जनतेची आता महायुतीचे सरकार बदलण्याची मानसिकता झाली आहे. विकास दर कोसळला आहे तर राज्यातील कायदा व सुव्यस्थेचा बोजवारा उडाला आहे. शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र राज्य सहाव्या स्थानावर घसरले आहे.
अर्थव्यस्थेत राज्यावर मोठा कर्जाचा डोंगर आहे. हे सरकार सत्तेतून जाईल, त्यावेळी राज्यावर साडेनऊ लाख कोटी रुपयांचे कर्ज असणार आहे. राज्यातील आर्थिक परिस्थिती डबघाईला आली असताना ती पूर्ववत करण्याची जबाबदारी येत्या काळात महाविकास आघाडीलाच घ्यावी लागणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.
शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेची सांगता बुधवारी इस्लामपूर शहरात शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या सभेला शरद पवार यांच्याबरोबर सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, रोहित पाटील यांच्यासह पक्षाचे खासदार, आमदार उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.