सांगली : प्रतिनिधी
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बदलापूर घटनेच्या निषेधार्थ ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली होती. मात्र याविरोधात याचिकेवर हायकोर्टात झालेल्या सुनावणीत कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही. जर तसा कुणी प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई करा, असे निर्देश मुंबई हायकोर्टाने सरकारला दिले. यानंतर आज महाविकास आघाडीकडून एक तास निषेध आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इस्लामपूर मतदारसंघामध्ये सरकारविरोधात निदर्शने केली. बदलापूरमधील घटनेवरून जयंत पाटील यांनी राज्य सरकार आणि पोलिस दलाच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीकास्त्र डागले.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात तोंडाला काळ्या फिती बांधून महायुती सरकारच्या विरोधात ही निदर्शने केली गेली. महाविकास आघाडीने पुकारलेला ‘महाराष्ट्र बंद’ मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा ठरविल्यानंतर हा बंद मागे घेण्याची घोषणा आघाडीकडून रात्री करण्यात आली आहे. बंद मागे घेण्यात आला असला तरी तोंडाला काळ्या फिती बांधून महायुती सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.
जयंत पाटील म्हणाले की, सध्या महाराष्ट्रातील पोलिस झोपलेल्या अवस्थेत आहेत. सरकारचे ऐकल्याशिवाय ते काही करत नाहीत. कोणती घटना घडली की, सरकारी पक्षाकडून कुणाचा फोन येतो का? याची पोलिस वाट पाहत आहेत. पण सरकारचे ऐकून देखील काही पोलिस अधिकारी निलंबित होतायत, त्यामुळे पोलिसांनी सरकारचे किती ऐकायचे हे लक्षात ठेवावे, असे त्यांनी म्हटले आहे.
जयंत पाटलांचा गुणरत्न सदावर्तेंवर निशाणा
‘बदलापूर बंद’चा नारा देत महाराष्ट्र एकवटायला लागला होता. पण सरकार अडचणीत आल्यावर काही विशिष्ट वकील समोर येतायत ही वस्तुस्थिती आहे. मराठा आरक्षणाबाबत देखील हेच वकील कोर्टात गेले होते, अशी टीका जयंत पाटील यांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर केली आहे.