मुंबई : प्रतिनिधी
मराठवाड्यातील परभणी येथे काल (बुधवार) संध्याकाळपासून पोलिस प्रशासनाने कोंबिंग ऑपरेशन सुरू केले आहे. राज्याला गृहमंत्री नाही, अशा परिस्थितीत राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी कोणी आणि कशी हाताळावी हा प्रश्न निर्माण झाला असल्याचा सवाल करत परभणीत सुरू असलेली पोलिस कारवाई चुकीची असल्याचा आरोप शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.
दरम्यान, ११ नोव्हेंबर रोजी परभणी शहरात तणाव निर्माण झाला होता, आंबेडकरी विचारांच्या पिढ्या बरबाद करण्याचे काम महाराष्ट्र सरकार करत आहे. परभणीत सुरू असलेले कोंबिंग ऑपरेशन बंद केले पाहिजे, असे सुषमा अंधारेंनी म्हटले आहे. सुषमा अंधारेंनी एक व्हीडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
त्यात त्या म्हणाल्या, विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला, त्यानंतर ते काळजीवाहू मुख्यमंत्री राहिले. तेव्हापासून आतापर्यंत राज्याला गृहमंत्री नाही. त्यामुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर तो कोणी हाताळावा आणि कसा हाताळावा हा प्रश्न निर्माण झाला आहे, असे सांगत त्यांनी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्या सरकारवर जोरदार टीका केली.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, परभणी हा अत्यंत संवेदनशील जिल्हा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाची प्रतिकृती उद्ध्वस्त केली जात असताना त्याची प्रतिक्रिया उमटणार हे स्वाभाविक होते. आंबेडकरी विचारांच्या संघटनांनी पुकारलेला बंद ही साहजिक प्रतिक्रिया होती. त्यासाठी पोलिसांकडून पूर्वतयारी करणे अपेक्षित होते. आंदोलकांनी अवलंबलेल्या मार्गाचे समर्थन करता येत नाही, मात्र अशी घटना घडण्याला कारणीभूत पोलिस यंत्रणा आहे, राज्याचे गृहखाते जबाबदार आहे, असा आरोप अंधारेंनी गृह खात्यावर केला.
पिढ्या बरबाद करणारी घटना
पोलिस खात्याकडून तिथे कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली आंबेडकरी तरुणांचे आयुष्य आणि भविष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून चालू असेल तर हा निंदनीय आणि निषेधार्ह प्रकार आहे. विटंबनेच्या घडलेल्या घटनेची चौकशी करण्यापेक्षा कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली पिढ्या बरबाद करण्याच्या घटनेचा शिवसेना ठाकरे गट निषेध करत असल्याचे सुषमा अंधारे म्हणाल्या.