35.1 C
Latur
Thursday, March 13, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात जीबीएसचा प्रादुर्भाव वाढतोय

राज्यात जीबीएसचा प्रादुर्भाव वाढतोय

कोल्हापुरात दोन रुग्ण पॉझिटिव्ह!

पुणे/कोल्हापूर : प्रतिनिधी
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. सोमवारी संध्याकाळी पुण्यातील जीबीएसच्या रुग्णांमध्ये वाढ झाली. पुण्यातील जीबीएसच्या रुग्णांची संख्या १११ वर पोहोचली आहे. आतापर्यंत केवळ पुण्यात या आजाराचे रुग्ण आढळत होते. परंतु, आता कोल्हापूरमध्येही दोघांना जीबीएसची लागण झाल्याची माहिती समोर आल्याने आरोग्य विभागात खळबळ माजली आहे.

राज्यात जीबीएस रुग्णसंख्या १११ वर पोहोचली असून, यातील १७ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. रुग्ण आढळून आलेल्या परिसरात आरोग्य विभागाकडून २५ हजार ५७८ घरांचे सर्वेक्षण केले आहे.
दरम्यान, पुण्यामध्ये थैमान घातलेल्या जीबीएस या आजाराचे दोन रुग्ण कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयामध्ये दाखल आहेत. कोगनोळी कर्नाटक येथील ६० वर्षांचे वृद्ध आणि हुपरी (ता. हातकणंगले) येथील ६ वर्षांच्या मुलावर दोन दिवसांपासून सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गुइलेन बॅरे सिंड्रोम रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने पुण्यात एक उच्चस्तरीय डॉक्टरांची टीम नियुक्त केली आहे. महाराष्ट्राच्या केंद्रीय पथकात राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (एनसीडीसी) दिल्ली, निम्हान्स बंगळुरू, आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागीय कार्यालय आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही), पुणे यातील सात तज्ज्ञांचा समावेश आहे.

राज्यात जीबीएस रुग्णसंख्या १११ वर पोहोचली असून, यातील १७ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. रुग्ण आढळून आलेल्या परिसरात आरोग्य विभागाकडून २५ हजार ५७८ घरांचे सर्वेक्षण केले आहे. राज्यातील एकूण रुग्णांपैकी ६८ पुरुष आणि ३३ महिला आहेत. जीबीएसच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. यामध्ये पुणे ग्रामीणमध्ये ६२ रुग्ण, पुणे महापालिका हद्दीत १९, तर पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत १४ रुग्ण असून, इतर जिल्ह्यांतील सहा रुग्ण हे पुण्यात उपचार घेत आहेत.

हा आजार संसर्गजन्य नसल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही, असे आवाहन प्रशासन आणि राज्य सरकारकडून सातत्याने केले जात आहे.

हा एक दुर्मिळ आजार असून हा आजार संसर्गजन्य नाही. प्राथमिक लक्षणांमध्ये हाता-पायांना मुंग्या येणे, अशक्तपणा, स्नायूंची कमजोरी, बोलण्यास व गिळण्यास त्रास होणे, चेहरा, डोळे, छाती आणि हात-पाय यांच्या स्नायूंचा अर्धांगवायू ही असून या आजाराचे पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडल्याने याचा अभ्यास शासनाच्या समितीच्या वतीने सुरू आहे. या आजारापासून बचावासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हेच गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR