मुंबई : पावसाळा सुरू झाला की अनेक आजार डोकं वर काढतात. सध्या राज्यात कोरोना, डेंग्यू, मलेरिया रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यातच आता झिका विषाणूंच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. राज्यात गेल्या आठवडाभरापासून झिका विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आता झिका विषाणूचे महाराष्ट्रात किती रुग्ण आहेत याची आकडेवारी समोर आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील झिका विषाणूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात १२८ झिका रुग्णांची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक झिकाचे रुग्ण हे पुणे महापालिका हद्दीत पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाकडून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात झिका आजाराच्या रुग्णांमध्ये सतत वाढ होत आहे. सुदैवाने मुंबईत अजून एकाही रुग्णाला झिका विषाणूची लागण झालेली नाही. तर पुणे महापालिका हद्दीत ९१, पुणे ग्रामीणमध्ये ९, पिंपरी-चिंचवड पालिका हद्दीत ६, अहमदनगर (संगमनेर) मध्ये ११, सांगली (मिरज) मध्ये १, कोल्हापूरमध्ये १, सोलापूरमध्ये १ असे रुग्ण आढळून आले आहेत. याच पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने सतर्क राहा, असे आवाहन केले आहे.