मुंबई : उत्तर भारतातून दक्षिण भारताकडे वाहणा-या थंड वा-यांनी पुन्हा एकदा वेग पकडला आहे. याचा परिणाम म्हणून राज्यासह मुंबईच्या किमान तापमानाचा पारा खाली आला आहे. राज्यातील अनेक शहरांचे किमान तापमान ११ अंश, तर मुंबईचे किमान तापमान १६ अंश नोंदविण्यात आले असून, पुढील तीन दिवस थंडी कायम राहील, अशी शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे.
३ जानेवारी रोजी मुंबईचे कमाल तापमान ३६ अंश नोंदविण्यात आले होते, तर ८ वर्षांपूर्वी २०१६ साली जानेवारी महिन्यात मुंबईचे कमाल तापमान ३६ अंश नोंदविण्यात आले होते. दरम्यानच्या काळात कमाल तापमान ३४ ते ३५ होते. त्यानंतर ८ वर्षांनी हिवाळ्यात जानेवारीत पारा पुन्हा ३६ नोंदविण्यात आला. रात्री थंड वारे वाहत आहेत. दिवसा पूर्वेकडून गरम वारे वाहत आहेत. त्यामुळे दिवसाचे तापमान अधिक आहे, तर रात्रीचे तापमान कमी आहे.
३ जानेवारीपासून पहाटेच्या किमान तापमानात घसरण होत आहे. शनिवारी राज्यात पहाटेचे किमान तापमान हे सरासरीइतके, तर भागपरत्वे ब-याच ठिकाणी अर्ध्या डिग्रीपासून ते साडेतीन डिग्रीपर्यंत खालावले आहे. त्यामुळे मुंबईसह कोकणात आणि उर्वरित महाराष्ट्रात थंडीत वाढ होत आहे, तर दुपारी ३ चे कमाल तापमान महाराष्ट्रात भागपरत्वे सरासरीपेक्षा एक डिग्रीपासून ७ डिग्रीपर्यंत वाढले आहे. त्यामुळे दिवसा ऊबदारपणा तर रात्री थंडी आहे.
– माणिकराव खुळे, हवामान अभ्यासक