17.5 C
Latur
Thursday, January 9, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात पुन्हा फोडाफोडीचे राजकारण?

राज्यात पुन्हा फोडाफोडीचे राजकारण?

अजित पवारांची शरद पवार गटाच्या खासदारांना ‘ऑफर’

मुंबई : प्रतिनिधी
राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा फोडाफोडीचे राजकारण होण्याची शक्यता वर्तवण्यात येऊ लागली आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या पक्षाकडून शरद पवारांच्या सात खासदारांना ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिले आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेर या सर्व घडामोडी सुरू होत्या, शरद पवार यांची मुलगी आणि खासदार सुप्रिया सुळे यांना वगळता शरद पवार गटाच्या इतर सर्व सात खासदारांना अजित पवार गटात येण्याची ऑफर देण्यात आली होती.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. महायुतीने २३५ जागा जिंकत अभूतपूर्व यश मिळवले, तर महाविकास आघाडीला ४९ जागांवर समाधान मानावे लागले. महाविकास आघाडीने आपल्या अपयशावर पुनर्विचार सुरू केला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अपयशावर चर्चा सुरू झाली. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ८ खासदार निवडून आले होते. पण विधानसभा निवडणुकीत ८६ जागांपैकी फक्त १० जागांवरच विजय मिळवता आला. त्यानंतर अनेकदा शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येण्याच्या चर्चांनाही उधाण आले होते. त्याचदरम्यान, दोन्ही गटांमध्ये अनेक घडामोडीही सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.

शरद पवार यांचे खासदार अजित पवार यांच्याकडे आल्यानंतर त्यांचे पुन्हा रीतसर पुनर्वसनही केले जाईल, असेही या खासदारांना सांगण्यात आले होते. पण शरद पवारांच्या खासदारांनी अजित पवारांची ऑफर नाकारली. शरद पवार आणि सुप्रिया सुळे वगळता आमच्या पक्षातील इतर खासदारांना अजित पवारांच्या पक्षात येण्याची ऑफर होती. पण त्या सर्व खासदारांनी हा प्रस्ताव नाकारला.

अजित पवारांच्या पक्षाकडून आलेल्या ऑफरबद्दल माहिती मिळताच शरद पवार चांगलेच नाराज झाले होते. इतकेच नव्हे तर त्यांनी अजित पवार गटाच्या नेत्यांना यापुढे असे प्रयत्न करू नयेत, असे सांगत चागलेच खडसावले होते. तसेच अजित पवारांच्या नेत्यांनी यापुढे असे प्रयत्न करू नयेत असेही बजावले आहे. पण अजित पवार यांची ऑफर स्वीकारली असती तर राज्यात पुन्हा एकदा फोडाफोडीचे राजकारण पाहायला मिळाले असते. पण शरद पवार यांनी ही बाब गांभीर्याने घेतल्यामुळे ही फोडाफोडी झाली नाही, असेही सांगितले जात आहे.

याबाबत अजित पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. ‘‘आम्ही केंद्रात एनडीएसोबत आहोत. महाराष्ट्रातही अजित पवार यांच्या नेतृत्वात महायुतीत सरकारमध्ये आहोत. निवडणुकीत महायुतीला राज्यात मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे आमची धोरणेही स्पष्ट आहेत. आम्ही सरकारसोबत आहोत.’’ असे सुनील तटकरेंनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR