29.1 C
Latur
Thursday, December 26, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यात बनावट औषध पुरवठा; आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

राज्यात बनावट औषध पुरवठा; आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

नागपूर : प्रतिनिधी

नागपूर, वर्धा, भिवंडी आणि आता अंबाजोगाईसह राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये बनावट औषध पुरवठ्याच्या घटना उघडकीस येत असून औषध पुरवठ्यात होणा-या बोगसगिरीची भांडाफोड झाली आहे. या प्रकरणात मोठे आंतरराज्यीय रॅकेट असण्याची शक्यता असून शासकीय रुग्णालयांमध्येच बोगस औषधांचा साठा सापडल्याने खळबळ उडाली आहे. मागच्या पंधरा महिन्यापासून या प्रकरणाचा तपास सुरू आहे, मात्र अद्याप प्रशासनाच्या हाती काहीच कसे लागले नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अंबाजोगाई प्रमाणेच नागपूर येथील शासकीय रुग्णालयास पुरवलेल्या औषधांचा साठा बनावट असल्याचे स्पष्ट होताच कोल्हापूरमधील विशाल एंटरप्राइजेस कंपनीसह सुरत, ठाणे आणि भिवंडी येथील औषध पुरवठादार आणि वितरकावर नागपूरच्या अजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे यामध्ये प्रमुख आरोपी असलेल्या विशाल एंटरप्राइजेसने मात्र गोळ्याचे उत्पादन करणा-या कंपनीच दोषी असल्याचे तपासात म्हटले आहे.

नेमकं प्रकरण काय?
नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला ६ लाख ९२ हजार किमतीच्या बनावट औषधांचा पुरवठा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पुरवठादार कंपनी विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. रिक्लॅव्ह ६२५ ही अँटीबायोटीक औषधं रुग्णालयाला पुरवली आणि रुग्णालयानं ही औषध रुग्णांना वाटप सुद्धा केली. याप्रकरणी अजनी पोलिसांनी चार कंपन्यांच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला.

कोल्हापुरातील विशाल एन्टरप्रायजेसचे सुरेश पाटील, सुरतची फार्मासिक्स बायटच्या प्रीती त्रिवेदी, भिवंडीतील अक्व्हाटीक बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मिहिर त्रिवेदी आणि मीरा रोडवरील काबिज जेनरिकचे संचालक विजय शैलेंद्र चौधरी या आरोपींचा समावेश असून यापैकी विजय चौधरी आणि मिहिर त्रिवेदी आधीच मार्च २०२३ मध्ये नागपूर जिल्ह्यात कळमेश्वर येथे दाखल झालेल्या अशाच प्रकरणात तुरुंगात आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR