27.5 C
Latur
Wednesday, October 23, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात मुलींच्या मोफत शिक्षणाची घोषणा हवेत!

राज्यात मुलींच्या मोफत शिक्षणाची घोषणा हवेत!

शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती घोषणा

मुंबई : प्रतिनिधी
राज्य सरकारने मुलींना शिक्षण मोफत देण्याची मोठी घोषणा केली होती. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी १ जूनपासून मोफत शिक्षण दिले जाईल, असे म्हटले होते. पण जून महिना अर्धा उलटला तरीही सरकारचा जीआर निघाला नाही किंवा अंमलबजावणी झाली नाही. आता मुलींना प्रवेशावेळी फी भरावी लागत आहे. त्यामुळे मोफत शिक्षणाची घोषणा हवेतच विरल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसावेळी म्हणजे ९ फेब्रुवारी २०२४ रोजी चंद्रकांत पाटील यांनी मुलींना मोफत शिक्षण दिले जाईल, अशी घोषणा केली होती. ज्या मुलींच्या पालकांचे उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी आहे, त्या मुलींना वैद्यकीय, अभियांत्रिकी, लॉ असो की ६६२ कोर्सेस असो, यासाठी कुठलीही फी लागणार नाही, शिक्षण मोफत करणार असल्याची घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली होती. पण ही घोषणा हवेतच विरल्याची चर्चा आहे. कारण अर्धा जून महिना उलटला, महाविद्यालयात प्रवेशही सुरू झाले. मात्र राज्य सरकारचा ना जीआर निघाला, ना अंमलबजावणी झाली. प्रवेशासाठी मुलींना भरमसाठ फी भरावी लागत आहे.

जळगाव येथील कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रात्री २ वाजता फोन आल्याचे सांगत परभणीतील अभियांत्रिकीचे शिक्षण घेणा-या एका मुलीने फी भरण्यासाठी आत्महत्या केल्याची घटना समोर ठेवून एक जूनपासून राज्यातील ज्या मुलींच्या पालकांचे उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी आहे, त्या मुलींना वैद्यकीय, अभियांत्रिकी, लॉसह ६६२ कोर्सेससाठी कुठलीही फी लागणार नाही, शिक्षण मोफत करणार असल्याची घोषणा केली होती. या घोषणेची अंमलबजावणी ही १ जून पासून होणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

अद्याप आदेश नाहीच
राज्यातील कुठल्याही महाविद्यालयाला सरकारचा अद्याप आदेशच मिळालेला नाही. विद्यार्थी आमची फीस माफ झाली असल्याचे महाविद्यालयांना सांगत आहेत तर महाविद्यालय असे कुठलेही परिपत्रक आले नसल्याचे सांगत आहे. यामुळे विद्यार्थी आणि महाविद्यालयातील अधिका-यांमध्ये वाद होत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR