22.1 C
Latur
Friday, December 13, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात रबीचे क्षेत्र वाढले

राज्यात रबीचे क्षेत्र वाढले

मुंबई : प्रतिनिधी
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे यंदा रबीचे क्षेत्र ९ लाख १६ हजार २७१ हेक्टरने वाढले आहे. राज्यात ३७ लाख १९ हजार ५६७ हेक्टर क्षेत्रावर रबीची पेरणी झाली होती. यंदा मात्र, १२ डिसेंबरपर्यंतच राज्यात ४८ लाख ९१ हजार ६०४ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. अद्यापही राज्यात अनेक ठिकाणी रबीची पेरणी सुरू असल्याने यंदा या क्षेत्रात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्यात रबी पिकाखालील सरासरी क्षेत्र ५३ लाख ९६ हजार ९६९ हेक्टर आहे. यंदा मान्सून चांगला झाल्याने रब्बी पिकांखालील क्षेत्रात किमान १० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ होईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.

कृषी विभागाच्या अहवालानुसार राज्यात १२ डिसेंबरपर्यंत ४८ लाख ९१ हजार ६०४ हेक्टर अर्थात सरासरी क्षेत्राच्या ८५.९० टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत मात्र यंदा अधिक पेरणी झाली आहे. राज्यात ३७ लाख १९ हजार ५६७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. अर्थात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा रबीचे क्षेत्र २४ टक्क्यांनी वाढले आहे. अद्याप रब्बी पेरणीसाठी वेळ हाती असून, अनेक ठिकाणी पेरणीला वेग आला आहे. त्यामुळे आता या क्षेत्रात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

सर्वाधिक पेरणी लातूर विभागात
यंदाच्या रबी हंगामात सर्वाधिक पेरणी लातूर विभागात झाली आहे. या विभागात सरासरी १३ लाख ६३ हजार ९३० हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी अपेक्षित असताना ९ डिसेंबरपर्यंतच १३ लाख ८० हजार ९०९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. हे प्रमाण सरासरीच्या १०१. २४ टक्के आहे. मागील वर्षीच्या तुलनेत मात्र यंदा या विभागात रबीची पेरणी २०.९८ टक्क्यांनी वाढली आहे. गेल्यावर्षी लातूर विभागात ११ लाख २१ हजार ४२१ हेक्टरवरच रब्बी पेरणी झाली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR