21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात वाढणार थंडीचा कडाका!; हवामान विभागाचा अंदाज

राज्यात वाढणार थंडीचा कडाका!; हवामान विभागाचा अंदाज

मुंबई : प्रतिनिधी
मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागात सध्या ढगाळ वातावरण असून आणखी दोन दिवस अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. दक्षिणेकडील चार राज्यांत होणा-या पूर्वीय वा-याच्या प्रणालीतून सध्या तेथे पडणा-या पावसाचा परिणामातूनच मुंबईसह दक्षिण महाराष्ट्रात ढगाळ वातावरणीय परिणाम जाणवणार आहे. या वातावरणामुळे सकाळी आणि सायंकाळी जाणवणारी थंडी नाहीशी झाली असली तरी उद्या, रविवारपासून पुन्हा थंडी जाणवेल, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

रविवारपासून गुलाबी थंडी पुन्हा अनुभवायला मिळणार असल्याने उकाड्याने त्रासलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळेल. विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात शुक्रवारप्रमाणे आज, शनिवारीही ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी किरकोळ स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांत ढगाळ वातावरणाचा परिणाम अधिक जाणवेल असा अंदाज आहे.

उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांत मात्र हा परिणाम जाणवणार नाही. या वातावरणामुळे सकाळ-संध्याकाळी जाणवणा-या थंडीला रविवारपर्यंत काहीसा विराम मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राज्यात सध्या दुपारचे कमाल तापमान ३३ अंश सेल्सियस तर पहाटेचे किमान तापमान २१ अंश सेल्सियसच्या दरम्यान असून ही दोन्हीही तापमाने सरासरीपेक्षा जवळपास दोन अंश सेल्सियसने अधिक आहेत. मुंबईसह कोकणातील ढगाळ वातावरणही निवळेल आणि रविवारपासून संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा थंडीसाठीची स्थिती पूर्ववत होईल, असा अंदाज आहे. पुढील दहा दिवस म्हणजे, सोमवार २५ नोव्हेंबरपर्यंत चक्रीवादळाची कोणतीही वातावरणीय निर्मिती दोन्हीही समुद्रात सध्या तरी जाणवत नाही. त्यामुळे दरम्यानच्या काळात महाराष्ट्रातही थंडीसाठी अटकाव करणारा कोणताही वातावरणीय बदल दिसत नसल्याचे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी म्हटले आहे.

ऊबदार कपड्यांची मागणी वाढली
थंडीची चाहूल लागताच नागरिकांकडून ऊबदार कपड्यांची मागणी वाढते. आतापर्यंत थंडी नसल्याने ऊबदार शाल, स्वेटर, मफलर यांची मागणी अद्याप कमी होती. मात्र दोन दिवसांनी थंडी परतल्यास गरम कपड्यांची मागणी वाढेल असा व्यापा-यांचा अंदाज आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR