25.6 C
Latur
Saturday, June 15, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात वातावरणाचा कहर!

राज्यात वातावरणाचा कहर!

उष्णतेसह अवकाळीचा दुप्पट मार कोकण, साता-यासह बहुतांश ठिकाणी मुसळधार शेतक-यांचे लाखोंचे नुकसान

मुंबई/पुणे : राज्यातील तापमानात सातत्याने वाढ होत आहे. कुठे उन्हाचा चटका बसत आहे. तर कुठे अवकाळीचा जोर पाहायला मिळत आहे. कोकणात मान्सून पूर्व पावसाने जोर धरला असून कोकण, साता-यात अवकाळी पावसामुळे शेतक-यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. तर उर्वरित राज्यामध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून पुढील काही दिवस बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अहमदनगर, जळगाव, नाशिक, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, आणि सोसाट्याचा वा-यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, मान्सून अंदमान निकोबार बेटांवर दाखल झाला आहे, ही एक आनंदाची बातमी आहे. मान्सूनची चाहूल लागली असून देशात मान्सून लवकरच दाखल होण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून दाखल होईल, असा अंदाज आहे. मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल झाल्यानंतर आता पुढे सरकण्यास सुरुवात झाली आहे. २४ तासांत दक्षिण-पूर्व अरबी समुद्रासह मालदीवच्या काही भागात मान्सूनचा प्रभाव जाणवू शकतो. दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान आणि निकोबार बेटांतील काही भागांमध्ये नैऋत्य मान्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्यामुळे अनेक राज्यांमध्ये पावसाचे वातावरण तयार झाले आहे.

साता-यात पत्रे उडाली
कोयना परिसरात वादळी वा-यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. सातारा जिल्ह्यातल्या पाटणमध्येही मुसळधार पाऊस कोसळत आहे. विजांचा कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळत आहे. वादळी वा-यामुळे पाटण आरल गावांमधील आठ घरांचे पत्रे उडाले आहे. त्याशिवाय शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. पाच दिवसापासून पाटणमध्ये सायंकाळच्या वेळेस वारे आणि मुसळधार पाऊस कोसळत आहे.

कोकणात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
मान्सूनपूर्व पावसामुळे कोकणातल्या ग्रामीण भागात जनजीवनावर काहीसा परिणाम झालेला दिसून येत आहे. विशेषत: बागायती शेतीला याचा फटका बसला आहे. तळकोकणात सर्वत्र मान्सून पूर्व पाऊस सुरु आहे. कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, वैभवाडीत मान्सून पूर्व पाऊस सुरु आहे. मान्सून पूर्व पावासामुळे शेतक-यांची काम खोळबली आहेत.

पिकांचे नुकसान
सिंधुदुर्गात गेले आठ दिवस सतत मान्सूनपूर्व पाऊस कोसळत आहे. यामुळे जिल्यातील आंबा आणि जाभूळ पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुळात यावर्षी जाभूळ पीक अत्यल्प प्रमाणात आले होते. त्यात मान्सून पूर्व पावसाने जांभूळ पीक शेतक-यांच्या हातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोकणातील सर्वात मोठ्या जांभूळ बाजारपेठेत जांभूळ नावालाही दिसत नाही. त्यामुळे जांभूळ पीक मान्सून पूर्व पावसामुळे अडचणीत आले आहे.

उष्णतेची लाट येणार
राज्यातील तापमानात सातत्याने वाढ होत आहे. कुठे उन्हाचा चटका बसत आहे. तर कुठे अवकाळीचा जोर पाहायला मिळत आहे. दरम्यान, संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, नंदुरबार, धुळे जळगांव, नाशिक, अहमदनगर अशा २४ जिल्ह्यात दुपारचे कमाल तापमान सरासरीपेक्षा ४ ते ६ डिग्री से. ग्रेड ने अधिक वाढणार आहे. म्हणजे ४० ते ४४ डिग्री से. ग्रेड दरम्यानचे राहणार असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. पण या स्थितीतही अवकाळीची शक्यता कायम राहणार आहे. आजपासून पुढील तीन दिवस म्हणजे शनिवार दि. २५ मे पर्यंत उष्णतेच्या लाटेची स्थिती जाणवू शकते अशी माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR