24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात ९ महिन्यांत ४ नेत्यांची हत्या

राज्यात ९ महिन्यांत ४ नेत्यांची हत्या

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सुरक्षा चव्हाट्यावर

मुंबई : राज्यात गेल्या नऊ महिन्यांत चार राजकीय नेत्यांची हत्या करण्यात आली आहे. शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर चांगलीच खळबळ उडाली असून, राजकारणात तीव्र पडसाद उमटत आहेत. तर बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने सोशल मीडियावर पोस्ट करून स्वीकारली आहे. या हत्येमुळे सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली असून सत्ताधा-यांनी पायउतार व्हावे, अशी मागणी विरोधकांकडून होत आहे.

वांद्रे पूर्व येथील खेरवाडी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांची गोळीबार करून हत्या करण्यात आली. वाय दर्जाचे संरक्षण असूनही बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली. बाबा सिद्दिकी यांना पंधरा दिवसांपूर्वी धमकीचे फोन आले होते. यानंतर निर्मलनगर खेरवाडीत त्यांची हत्या करण्यात आली. पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. या दोघांपैकी एक हरियाणाचा आणि दुसरा उत्तर प्रदेशचा आहे.

९ महिन्यांत ४ नेत्यांच्या हत्या
७ फेब्रुवारी २०२४ रोजी चाळीसगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्यावर काही अज्ञातांनी गोळीबार केला. यात उपचारादरम्यान, महेंद्र मोरे यांचा मृत्यू झाला होता. ९ फेब्रुवारी २०२४ रोजी फेसबुक लाईव्ह करत दहिसरमध्ये शिवसेनेच्या अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली. मॉरिस नोरोन्हा ऊर्फ ​​मॉरिस भाई याने अभिषेक घोसाळकर यांची हत्या केली. यानंतर मॉरिसने आत्महत्या केली. यानंतर ४ ऑक्टोबर २०२४ रोजी भायखळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष सचिन कुर्मा यांची हत्या करण्यात आली होती. सचिन कुर्मा यांच्यावर भायखळामधील म्हाडा कॉलनीत धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. यानंतर बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली यामुळे महाराष्ट्र हादरला असून, सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR