मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्राला देशातील ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्ट असून, गेल्या वर्षी राज्याने अर्ध्या ट्रिलियनचे उद्दिष्ट पार केले आहे. आता २०२८ ते २०३० पर्यंत महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवणार आहोत, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहेच. मात्र, येणा-या काळात मुंबई फिनटेकची राजधानी बनेल, असेही त्यांनी सांगितले.
वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक परिषदेचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचा निर्धार बोलून दाखवला. महाराष्ट्र आज मोठ्या गतीने पुढे चालला आहे. महाराष्ट्र राज्याला देशातील सर्वाधिक विकसित राज्य बनवण्यासाठी सल्लागार समितीची स्थापना केली असून या समितीच्या सल्ल्याने महाराष्ट्र कोणकोणत्या क्षेत्रात पुढे जाऊ शकतो, याचा आम्ही अभ्यास केला. यावर आधारित महाराष्ट्र राज्याच्या विकासाची धोरणे बनवली आहेत. विकासाच्या गतीमध्ये जागतिक पातळीवर महाराष्ट्र विकासाला पूरक एक साखळी बनवत आहे. महाराष्ट्राचे लॉजिस्टिक धोरण, सर्वाधिक गतिमान रस्त्यांचे जाळे बनवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. नागपूर-मुंबई समृद्धी हा महामार्ग थेट जेएनपीटी बंदराला जोडला असून यातून अत्यंत चांगल्या पुरवठादारांची साखळी निर्माण होणार आहे. रस्ते, विमान वाहतूक, बंदर विकास या पायाभूत सुविधा सक्षम करण्यावर महाराष्ट्र सरकार भर देत आहे, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासाला गती देणारी नवीन धोरण बनवलेली आहेत. विकासामुळे लोकांमध्ये दुरावा वाढला आहे, असे म्हटले जात असताना भारताने गेल्या १० वर्षात २५ कोटी जनतेला दारिद्रयरेषेवर आणले आहे. सन २०३० पर्यंत भारताला पाच ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवणार असून हे उद्दिष्ट तर आम्ही २०२८ पर्यंतच पूर्ण करू.
यावेळी वर्ल्ड हिन्दू इकनॉमिक फोरमचे संस्थापक स्वामी विद्यानंद, माजी मंत्री तथा आमदार मंगलप्रभात लोढा, वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरमचे अध्यक्ष राजेश शर्मा, प्रमुख वक्ते पद्मश्री टी. व्ही. मोहनदास पै, सहसचिव शैलेश त्रिवेदी यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सरकारचा शाश्वत
विकासावर भर
आम्ही आधुनिक तंत्रज्ञानावरती आधारित विकासावर भर देत आहोत. राज्यातील वनांचे आच्छादनदेखील जास्त आहे. हरित ऊर्जा, नदीजोड प्रकल्प यातून शाश्वत विकासावर राज्य भर देत आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.