22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रराज्य उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीत अव्वलच

राज्य उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीत अव्वलच

विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचे उत्तर

मुंबई : सध्या विरोधकांकडून उद्योग पळवल्याची कोल्हेकुई सुरू आहे. मात्र, ते खोटे आहे. उलट उद्योजकांचा विश्वास वाढला आहे. दावोसला ३ लाख ७३ हजार कोटींचे एमओयू सही झाले. येथे आल्यानंतर आणखी २ लाख कोटीचे एमओयू झाले. यातून साडेतीन लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे उद्योग, गुंतवणुकीत महाराष्ट्र पुढे आहे. हे उद्योग आल्यानंतर १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करू, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

विरोधी पक्षाच्या वतीने विधानसभेत नियम २९३ अन्वये मांडलेल्या चर्चेला उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी आपल्या खास शैलीत विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या टिकेचा समाचार घेतला. युवक, महिला, गरीब, अन्नदाता शेतकरी या चार घटकांसाठी कल्याणकारी योजना राबवित आहोत. पायाभूत सुविधांसाठी मोठी तरतूद केली आहे. शेतक-यांसाठी मागेल त्याला सौर कृषिपंप ही नवीन योजना, जलयुक्त शिवार योजना राबवित आहोत. ३७ हजार अंगणवाडी सेविकांना सौरउर्जा संच देत आहोत. विरोधी पक्षाची एकच स्क्रिप्ट एकच ड्राफट असतो. नवीन काहीच नसते. मुद्यावर टीका करा ना. मुद्दा नसला की अपशब्द वापरायचे, थयथयाट करायचा. पक्ष चोरला, चिन्ह चोरले म्हणून आरोप करता, पण स्वार्थासाठी विचार, भूमिका ज्यांनी विकली, त्यांनी हे आरोप करू नये. बाराही महिने विरोधकांनी राजकीय धुळवड करण्याचा विरोधकांचा प्रयत्न केविलवाणा असल्याचे ते म्हणाले. विरोधकांना शेतक-यांच्या प्रश्नांशी देणेघेणे नाही. विरोधी पक्ष कोमात गेला की काय अशी अवस्था आहे.

शेतक-यांना काय दिले त्याचा सभागृहात हिशोब तरी आमच्याकडून घ्यायचा होता. हे सरकार शेतक-यांना कधी वा-यावर सोडणार नाही. आधीच्या सरकारने शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसली, पण आम्ही अश्रू पुसण्याचे काम केले. शेतक-यांच्या खात्यावर ५ हजार ५२० कोटी रूपये जमा केले राज्य सरकारने. आता डीबीटीने सरकारची सर्व मदत शेतक-याला जाते. आधीच्या सरकारने सर्व सिंचन प्रकल्­प बंद पाडले होते, आम्ही १२१ सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली. यातून १५ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. मराठवाडा वॉटरग्रीडलाही चालना देतो आहोत. धानाला आतापर्यंत दिला नव्हता तितका २० हजार रूपये हेक्टरी बोनस दिला. दूधउत्पादक शेतक-यांंना दुधासाठी प्रतिलीटर ५ रूपये अनुदान देण्यात आले. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाचा पाणीसाठा कमी आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कृÞतिआराखडा तयार करून मात करण्यात येत आहे. मुंबईकरांना देखील पाणीकपात होणार अशी चर्चा सुरू होती पण त्यात तूर्तास मुंबईकरांना कोणतीही पाणीकपात केली जाणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. आंगणवाडी सेविकांच्या मानधनात २० टक्के वाढ केली आहे. १ लाख १५ हजार मोबाईल संच त्यांना देणार आहोत. आंगणवाडीतील २० हजार रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली. आशासेविकांबाबत चर्चा केली आहे त्यांनाही सरकार न्याय देणार आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR