22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रराज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्याचे ट्रेलर लॉन्च

राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्याचे ट्रेलर लॉन्च

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत सामील होणार असल्याची चर्चा होती. याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री तथा भाजप नेते अमित शहा यांची भेट घेतली होती.

परंतु यावर अद्याप कोणताही ठोस निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे मनसे कार्यकर्ते देखील संभ्रमात आहेत.
अशातच राज ठाकरेंनी आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून गुढीपाडव्याच्या मेळाव्याचा ट्रेलर लॉन्च केला आहे. ‘९ तारखेला शिवतीर्थावर या, नक्की काय घडलंय, काय घडतंय हे मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचं आहे,’ असं म्हणत राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या सभेत नेमकं काय घडतंय? सर्व सांगणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे मोठी भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे.

मनसेचा महायुतीला कसा होणार फायदा? शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदे आणि ठाकरे असे दोन गट निर्माण झाले आहेत. मुंबईवर विजय मिळवण्यासाठी आणि ठाकरेंना रोखण्यासाठी महायुतीला मनसेची मदत होऊ शकते. कारण मुंबईत शिवसेनेसोबतच मनसेचे वजनही मोठे आहे. शिवसेनेप्रमाणे मराठी व्होट बँक मनसेच्या बाजूनेही आहे. मागील निवडणुकीतही मराठी व्होट बँक मनसेने मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे खेचली होती. त्यामुळे ठाकरेंना शह देण्यासाठी भाजपने मनसेला महायुतीत सामील करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र सध्या यावर कोणताही निर्णय झालेला नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR