26.4 C
Latur
Saturday, February 22, 2025
Homeरामलल्लाच्या प्रसादाच्या शुद्धतेची तपासणी होणार

रामलल्लाच्या प्रसादाच्या शुद्धतेची तपासणी होणार

अयोध्या : वृत्तसंस्था
तिरुपती बालाजी मंदिरातील लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी मिसळल्याची घटना समोर आल्यानंतर देशभरात संतापाची लाट आहे. या घटनेवरुन देशभरातील मोठ्या मंदिरांमध्ये केल्या जाणा-या प्रसादाच्या शुद्धतेवर आणि पावित्र्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, या घटनेचा धडा घेत देशभरातील अनेक मंदिरे अलर्ट झाली आहेत. यामुळेच आता देशभरातील मंदिरांमधून प्रसादाचे नमुने तपासणीसाठी पाठवले जात आहेत.

यामध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिराचाही समावेश आहे. श्रीराम मंदिरातील प्रसादाचे नमुनेही प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच, अयोध्येतील संतांनी बैठक घेऊन बाजारातून खरेदी केलेला प्रसाद मंदिरांमध्ये देवाला अर्पण करू नये, असे आवाहन केले. अयोध्येच्या राम मंदिरात रामाला रबडी आणि पेढा अर्पण केला जातो आणि प्रसाद म्हणून वेलचीचे दाणे वाटले जातात. या सर्व गोष्टींचे नमुने घेण्यात आले आहेत. तपास अहवाल आल्यानंतर मंदिराच्या प्रसादात भेसळ आहे की नाही, हे निश्चित होईल.

राम मंदिर ट्रस्टचे कार्यालय प्रभारी प्रकाश गुप्ता सांगतात की, बाहेरून रामलल्लाला प्रसाद दिला जात नाही. भाविक दर्शनासाठी रिकाम्या हाताने मंदिरात जातात. राम मंदिर ट्रस्टतर्फे भाविकांना प्रसाद म्हणून वेलची बियांचे वाटप केले जाते. लहान वेलची आणि साखर मिसळून हा प्रसाद तयार केला जातो. हा प्रसाद स्वच्छ आणि आरोग्यदायी पद्धतीने बनवला जातो. प्रसादाची वेळोवेळी तपासणी केली जाते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR