छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
अनेक वेळा वादग्रस्त विधान करणा-या रामगिरी महाराजांनी पुन्हा केलेले विधान वादाच्या भोव-यात सापडणार आहे. ‘‘राष्ट्रगीत ‘जण गण मन’ नव्हे, तर ‘वंदेमातरम्’ असायला हवे’’, अशी मागणी त्यांनी केली. ‘ मिशन अयोध्या’ या चित्रपटाच्या शुभारंभ प्रसंगी त्यांनी ही मागणी केली आहे.
दरम्यान, ‘मिशन अयोध्या’ चित्रपटाचे प्रदर्शन २४ जानेवारी २०२५ रोजी एकाच वेळी महाराष्ट्रात होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये रामगिरी महाराज यांच्या हस्ते ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले. त्यावेळी रामगिरी महाराजांनी मनोगत व्यक्त करताना वंदेमातरम् आपले राष्ट्रगीत असायला हवे, अशी मागणी केली.
आपण म्हणत असलेले राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी इंग्रज राजा पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी १९११ मध्ये लिहिले होते. यामध्ये देशाचे भाग्यविधाता ते असल्याची स्तुतिसुमने त्यांनी गायली. अशा गीताला आपले राष्ट्रगीत मानणे योग्य नाही. त्यावेळी रवींद्रनाथ टागोर यांचे शैक्षणिक क्षेत्रात मोठे काम होते. ते काम सुरू ठेवण्यासाठी त्यांनी इंग्रजांना खुश करण्यासाठी त्यांनी गीत केले. मात्र यात बदल व्हायला हवा, वंदेमातरम् हेच आपले राष्ट्रगीत व्हावे, अशी मागणी महंत रामगिरी महाराज यांनी केली. दरम्यान काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी रामगिरी महाराज यांनी राष्ट्रगीतावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
राष्ट्रगीत प्रेरणादायी असावे : रामगिरी महाराज
देशाचे राष्ट्रगीत प्रेरणादायी असावे आणि स्तुती करणारे असावे, अशी मागणी त्यांनी केली. यात कोणाचा अवमान करण्याचा मानस नाही. याबाबत आपण अभ्यास केला तर केलेली मागणी सर्वांना पटेल, असे महंत रामगिरी महाराज यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले. त्याचबरोबर देशात सर्व धर्मियांनी एकत्र रहावे, मुस्लिम बांधव यांच्याशी भांडण नाही, काही वाद एकत्र येऊन सोडवायला हवेत, असे रामगिरी महाराज यांनी सांगितले.
अतुल लोंढे यांचा जोरदार हल्लाबोल
महंत रामगिरी महाराज यांनी भारतीय राष्ट्रगीतावर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे महंत रामगिरी महाराज यांच्यावर टीका होत आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही या प्रकरणी रामगिरी महाराज यांच्यावर हल्लाबोल केला. आमच्या राष्ट्रीय प्रतिकांचा संबंध आमच्या भावनांशी जोडलेला आहे. मात्र काही लोक देशाची अस्मिता असलेल्या प्रतिकांना अगोदरपासून लक्ष्य करत आले आहेत. मग देशाचे संविधान असेल, देशाचा तिरंगा झेंडा असेल किंवा देशाचे राष्ट्रगीत असेल. रवींद्रनाथ टागोर यांनी देशाच्या राष्ट्रगीताबाबत अगोदरच १९१२ ते १९३६ दरम्यान खुलासा केला आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी सव्यसाची भट्टाचार्य यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी स्पष्ट शब्दांत हे राष्ट्रगीत कोणत्याही नेत्यासाठी लिहिण्यात आले नाही. अधिनायक म्हणजे सर्वशक्तिमान ईश्वर किंवा देशातील जनता, असा अर्थ घेतला आहे.