सोलापूर : प्रतिनिधी
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी महापौर अभ्यासू नेते महेश कोठे यांचे सोमवारी (दि. १३) निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सोलापुरातील झुंजार नेतृत्व हरपल्याची भावना राजकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे. कोठे प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी गेले होते. नदीमध्ये शाही स्नान करून बाहेर पडले. त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा जोराचा झटका आला. हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून कोठे यांनी निवडणूक लढवली होती. यात त्यांना अपयश आले होते. आतापर्यंत त्यांनी तीनवेळा विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचे आमदार होण्याचे स्वप्न अपुरे राहिले. काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी महापालिकेचे महापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते अशी पदे भूषवली. महापालिकेत त्यांचा मोठा दबदबा होता.
महापालिकेचे अनेकवेळा बजेट सादर करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर होता. बजेटवर ते अभ्यासू भाषण करत. कोठे यांच्या निधनामुळे राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे. कोठे यांचे पार्थिव विशेष विमानाने सोलापुरात आणले जाणार आहे. मुरारजी पेठ येथील ‘राधाश्री’ निवासस्थानी त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवले जाणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा नगरसेवक प्रथमेश कोठे आहे.