जळकोट : प्रतिनिधी
येणा-या काही महिन्यांमध्ये राज्यभरात विधानसभेचा बिगुल वाजणार आहे. नोव्हेंबर पूर्वीच विधानसभेच्या निवडणुका होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. याची पुर्व तयारी देखील निवडणूक विभागाकडून सुरू झालेली आहे. अशा मध्ये आता विविध राजकीय पक्षाकडून निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आलेली आहे. उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघांमध्ये अजित पवार गटाकडून निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आलेली आहे. याचाच एक भाग म्हणून राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांनी जळकोट येथे दि २२ रोजी जळकोट तालुक्यातील बुथ प्रमुखांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते .
महायुतीच्या सरकारमध्ये ते तर कॅबिनेट मंत्री असून त्यांच्या गाडीला पाच वर्षापासून लाल दिवा आहे . असे असले तरी निवडणुकीमध्ये सर्व ताकदीने उतरण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. मंत्री असले तरी निवडणुकीमध्ये कुठलीही कसर राहू नये यासाठी त्यांनी आतापासून तयारी सुरू केली आहे. यापूर्वी देखील मंत्री संजय बनसोडे यांनी कार्यकर्त्यांच्या अनेक बैठका घेतलेल्या होत्या. उदगीर येथे अगोदरच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय आहे परंतु जळकोट येथे देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय थाटलेले आहे. येणारी विधानसभा आपणास पूर्ण ताकदीने लढायची असून त्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी, गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला जास्तीचे मतदान कसे पडेल यासाठी लक्ष द्यावे, साडेचार वर्षांमध्ये झालेली विकास कामे जनतेपर्यंत घेऊन जावे असे आवाहन देखील त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.