मुंबई : राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाले आहेत. यामुळे आता मोदींना त्यांना रामराम करूनच लोकसभेत यावे लागणार, असा टोला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत यांनी आज पंतप्रधान मोदींना लगावला.
माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत नरेंद्र मोदी यांच्या अटी, शर्तींवर लोकसभा चालली. परंतु आता विरोधी पक्ष मजबूत आहे. यामुळे सभागृहातून नरेंद्र मोदी यांना पळ काढता येणार नाही, असेही राऊत म्हणाले.
ओम बिर्लावर निशाणा साधत राऊत म्हणाले की, १७ व्या लोकसभेत एकाच वेळी ७५-८० खासदारांचे निलंबन करून लोकशाहीचा गळा घोटणा-या ओम बिर्ला यांना पुन्हा अध्यक्षपदावर मोदी बसवत आहेत. प्रोटेम स्पीकर पदासाठी सर्वांत ज्येष्ठ असलेल्या के. सुरेश यांना डावलून कमी वेळा खासदार असलेल्या व्यक्तीला प्रोटेम स्पीकर पदावर बसवले. त्यामुळे त्यांना आम्ही आमची ताकद दाखवून देत आहोत, असेही संजय राऊत यांनी म्हटले. दरम्यान, अरविंद केजरीवाल प्रकरणात केजरीवालांना जामीन मिळाला असताना सरकारने दबाव तंत्राचा वापर करून त्यांचा जामीन रद्द करून घेतला, असा गंभीर आरोप देखील खासदार राऊत यांनी केला.