वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी अमेरिका दौ-यावर आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल एक मोठे वक्तव्य करताना ते म्हणाले, ‘पीएम मोदी मला आवडतात’. राहुल गांधी यांनी त्यांच्या या विधानाने अनेकांना चक्रावून टाकले.
‘भारत हा भाषा, परंपरा, धर्माचा एक संघ आहे. भारतीय लोक आपल्या धार्मिक स्थळांवर जातात, त्यावेळी ते विलीन होऊन जातात. भारताचा हा स्वभाव आहे’ असे राहुल गांधी म्हणाले. ‘भारत वेगवेगळ्या गोष्टींचा एक समूह आहे हा भाजप आणि आरएसएसचा गैरसमज आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल नरेंद्र मोदी मला आवडतात. मी त्यांचा द्वेष करत नाही. त्यांचा जो दृष्टीकोन आहे, त्याच्याशी मी सहमत नाही. पण म्हणून मी त्यांचा द्वेष करत नाही. त्यांच्याबद्दल मला सहानुभूती सुद्धा आहे’’ असे राहुल गांधी म्हणाले.
आरएसएसने शिक्षण व्यवस्थेवर ताबा मिळवला. मीडिया आणि तपास यंत्रणा त्यांच्या ताब्यात आहेत. आम्ही हे म्हणत होतो, पण लोकांना समजत नव्हते. जातीय जनगणनेचा मुद्दादेखील मोठा झाला, असे राहुल गांधी म्हणाले.
‘निष्पक्ष निवडणुकीत भाजपा २४६ च्या जवळ असती, असे मला वाटत नाही. संपूर्ण देशभरात मोदी काम करु शकतील असे अभियान बनवण्यात आलेले. ज्या राज्यात ते कमजोर होते, तिथे वेगळ्या पद्धतीने डिझाईन करण्यात आलेले. मी याकडे स्वतंत्र निवडणूक म्हणून नाही, तर नियंत्रित निवडणूक म्हणून पाहतो’ असे राहुल गांधी म्हणाले.