रविवारी प्रियंका गांधी चंद्रपूरमध्ये
नागपूर : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर पूर्व विदर्भातील निवडणुकीच्या आखाड्यात आता काँग्रेसचे स्टार प्रचारक राहुल गांधी आणि प्रियंका गांधी उतरणार आहेत. राहुल गांधी यांची सभा शनिवारी साकोली येथे तर प्रियंका गांधी यांची सभा सोमवारी चंद्रपूर येथे आयोजित केली आहे. विशेष म्हणजे संघभूमी अशी ओळख असलेल्या नागपूरमध्ये काँग्रेसच्या एकही बड्या नेत्याची सभा नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पूर्व विदर्भातील ५ लोकसभा मतदारसंघामध्ये १९ एप्रिलला मतदान होणार आहे. रामनवमी (१७ एप्रिल) हा प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने पुढच्या आठवड्यात मोठे नेते विदर्भात येण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या उमेदवारांकडून सर्वाधिक मागणी राहुल गांधी यांना आहे. येथे काँग्रेसने डॉ. प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिली आहे. नाना पटोले यांनी त्यांच्या विजयाची ‘गॅरंटी’ घेतली आहे. भाजपने येथे खासदार सुनील मेंढे यांना पुन्हा उमेदवारी दिली. प्रियंका गांधी चंद्रपूरच्या महायुतीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारासाठी सोमवारी येत आहेत. चंद्रपूर शहरात त्यांची सभा आयोजित केली आहे.
मोदी, खरगे दीक्षाभूमीवर?
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ एप्रिलला दीक्षाभूमीवर येणार असल्याची चर्चा आहे. अद्याप या दोन्ही नेत्यांचा अधिकृत दौरा आलेला नाही. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांना अभिवादन करण्यासाठी दोन्ही नेते येणार असल्याचे कळते.